रेल्वेचे आरक्षण ‘हाऊसफुल’; ‘एस.टी.’बरोबर खाजगी बसचाही भाडेवाढीचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:34 PM2018-10-27T13:34:56+5:302018-10-27T13:37:13+5:30
नोकरदार, व्यावसायिक आणि शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या मंडळींची लगबग सुरू झाली आहे.
औरंगाबाद : प्रकाशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाण्यासाठी आणि दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नोकरदार, व्यावसायिक आणि शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या मंडळींची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात पहिले प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी अनेक रेल्वेचे आगामी दिवसांतील आरक्षण हाऊसफुल झाले आहे.
शहरात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आलेले मराठवाड्यातील विविध भागांसह विदर्भ, खान्देशमधील नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. शिवाय सुट्यांनिमित्त अनेकांनी पर्यटनाचेही नियोजन केले आहे. यासाठी प्रवासासाठी पहिले प्राधान्य रेल्वेला दिले जाते. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण करण्यावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसह विविध रेल्वेगाड्यांचे आगामी काही दिवसांमधील बुकिंग हाऊसफुल झाले आहे.
नंदीग्राम एक्स्प्रेसचे २६ तर देवगिरी एक्स्प्रेसचे २६ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण फुल झालेले आहे. तर सचखंड एक्सप्रेसचे आरक्षण जानेवारीपर्यंत फुल झालेले आहे. इतर रेल्वेचीही अशीच परिस्थिती आहे. दिवाळीत पर्यटनासाठी जाण्याचा अनेकांचा ओढा आहे. यात दक्षिण भारतातील विविध ठिकाणांसह राजस्थान, भूतानला जाण्याकडे अनेकांचा कल आहे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंतसिंग यांनी सांगितले.
‘एसटी’ जादा बस
प्रवासासाठी एसटीने जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून जादा बस सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमान प्रवासाकडे कल
पर्यटनाबरोबर धार्मिकस्थळी जाण्याकडेही कल दिसून येत आहे. तिरुपतीला जाण्याचा कल अधिक आहे. त्यासाठी विमानसेवेलाही अनेकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे हैदराबादला जाणारे विमान आजघडीला दररोज फुल जात असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या फारशी बुकिंग नाही. परंतु आगामी काही दिवसांत बुकिंग वाढेल, अशी अपेक्षा अन्य विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
१५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ
एस.टी. महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर १ ते २० नोव्हेंबरदरम्यान १० टक्के भाडेवाढ क रण्याचा निर्णय घेतला आहे, तर खाजगी बसचीही १५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचा दणका बसणार आहे. खाजगी बसने प्रवास करण्यासाठीही आरक्षण करण्यावर भर दिला जात आहे. खाजगी बसची १५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ होईल, असे औरंगाबाद बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंटचे अध्यक्ष राजन हौजवाला म्हणाले.