आरक्षण निघाले; मात्र गावात पात्र उमेदवारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:03 AM2021-02-07T04:03:57+5:302021-02-07T04:03:57+5:30
पैठण : न्यायालयीन प्रक्रियेत लांबलेले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण अखेर शनिवारी काढण्यात आले. परंतु, सोडतीदरम्यान तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचे निघालेले आरक्षण ...
पैठण : न्यायालयीन प्रक्रियेत लांबलेले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण अखेर शनिवारी काढण्यात आले. परंतु, सोडतीदरम्यान तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचे निघालेले आरक्षण लक्षात घेता त्या प्रवर्गातील सदस्यच संबंधित ग्रामपंचायतींमधून निवडून आलेला नसल्याने आता सरपंच कोण होणार, असा प्रश्न निवडून आलेल्या सदस्यांसमोर उभा राहिला आहे.
या गावांतील सदस्य दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याने पैठण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाचा पेच पुन्हा उभा राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे आरक्षण रीपिट झाल्याने पैठण तालुक्यातील आरक्षण लांबले होते. न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी अखेर सरपंचपदाचे आरक्षण तहसील कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षणात ढाकेफळ या ग्रामपंचायतसाठी सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी, तर एकतुणी व आडूळ खुर्द येथील सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलासाठी राखीव निघाले. वास्तविक या ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच निवडून आलेला नाही. तसेच त्या प्रवर्गाचे आरक्षण निवडणुकीदरम्यान नव्हते. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहणार आहे. ढाकेफळ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निघालेल्या आरक्षणातील सदस्य नसल्याने कुठल्याही सदस्यास सरपंच होता येणार नाही. प्रशासनाने आरक्षण काढताना याचा विचार केला नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ढाकेफळचे पॅनलप्रमुख तुषार शिसोदे यांनी दिली.
----- उपसरपंचाकडे कारभार -----
पैठण तालुक्यातील ढाकेफळ, एकतुणी व आडूळ खु या ग्रामपंचायतींत सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निघालेले आरक्षण शिफ्ट करता येत नाही. त्यामुळे या गावातील सरपंचपद रिक्त राहणार असून, उपसरपंच कामकाज पाहतील.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार