घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर, वरिष्ठांच्या खांद्यावर रुग्णसेवा
By संतोष हिरेमठ | Published: January 2, 2023 09:19 AM2023-01-02T09:19:11+5:302023-01-02T09:19:50+5:30
ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती आहे.
औरंगाबाद : नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी, आज सोमवारपासून राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील निवासी डाॅक्टर संपावर गेले. त्यामुळे रुग्णसेवेला फटका बसणार आहे.रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहायक, सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
निवासी डॉक्टर अत्यावश्यक सेवा देणार आहेत. त्यामुळे अपघात, प्रसूती अशा अत्यावश्यक सेवेवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती आहे.
कोणत्या मागण्यांसाठी संप
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदनिर्मितीच्या जागा भरण्यासंदर्भातील प्रस्ताव मार्गी लावावा, वसतिगृहांच्या दुरुस्ती करून आवश्यक सोयी-सुविधा द्याव्यात, महागाई भत्ता, वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी एका वर्षापासून पाठपुरावा सुरू असून, शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टर संपावर गेले.