कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केसच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप
By संतोष हिरेमठ | Published: August 13, 2024 11:29 AM2024-08-13T11:29:17+5:302024-08-13T11:29:42+5:30
घाटी रुग्णालयातील ५३२ निवासी डॉक्टर संपात उतरले आहेत
छत्रपती संभाजीनगर : कोलकाता येथील मेडिकल काॅलेजमध्ये एका महिला डाॅक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी सकाळी ९ वाजेपासून घाटीत संप सुरू केला आहे
घाटी रुग्णालयातील ५३२ डॉक्टर संपात उतरले आहेत. यामुळे रुग्णसेवेला फटका बसणार आहे.रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहायक, सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. निवासी डॉक्टर अत्यावश्यक सेवा देणार आहेत. त्यामुळे अपघात, प्रसूती अशा अत्यावश्यक सेवेवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रियांवर परिणाम होण्याची भीती आहे.
दोन महिन्यांपूर्वी छेडछाडीची घटना
जून महिन्यात घाटी परिसरात डेंटलच्या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडली. या घटनेनंतर वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक वाढविण्यात आले. तसेच घाटीचे सुरक्षा ऑडिट करून घेण्यात आले.
किमान १०० सुरक्षारक्षक वाढवावे
घाटीत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, आणखी किमान १०० सुरक्षारक्षक वाढविण्याची आवश्यकता आहे. सुरक्षा ऑडिटमधून ही गरज स्पष्ट झाली आहे. नवीन हाॅस्टेल होणेही आवश्यक आहे. कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपाचा इशारा देण्यात आला आहे.
- डाॅ. रोहन गायकवाड, अध्यक्ष, मार्ड