छत्रपती संभाजीनगरातील गॅस गळतीचा धोका टळला; १२ तासांनी टँकर हटले, वाहतूक पूर्ववत
By सुमेध उघडे | Published: February 1, 2024 08:35 PM2024-02-01T20:35:43+5:302024-02-01T20:36:02+5:30
सायंकाळी साडेसहा वाजता जालना रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिडको उड्डाणपुलावरील अपघातग्रस्त टँकरमधील गळती थांबवून त्यातील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये यशस्वीरीत्या टाकण्यात आला. यामुळे आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या गॅस गळतीच्या थरारक घटनेला पूर्णविराम मिळाला. सायंकाळी साडेसहा वाजता जालना रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आणि महापालिका, महसूल प्रशासनास गॅस गळतीची तीव्रता सांगून संभाव्य धोक्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी तत्काळ सिडको उड्डाणपूल परिसरातील १ किलोमीटरचा भाग रिकामा केला होता. तसेच ज्वलनशील पदार्थ न वापरण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गॅस गळतीवर अग्निशमन दल, एचपीसीएल कंपनी, महापालिका, महसूल आणि पोलिस विभागांचे अधिकारी-कर्मचारी पोलीस प्रशासन यांनी मिळून या आपतकालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यासाठी तब्बल १२ तास लागले, तसेच अग्निशमन दलाने तब्बल ७० पाण्याचे टँकर पाण्याचा मारा केला.
असा आहे घटनाक्रम: सकाळी सव्वा पाच वाजता टँकर उड्डाणपूलास धडकून गॅस गळती सुरू झाली. ५ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल. सकाळी ९ वाजेपासून परिसरातील घरे, दुकाने रिकामी करण्याचे पोलिसांनी आवाहन केले. दुपारी एक वाजता दुसऱ्या टँकरमध्ये गॅस घेणे सुरू करण्यात आले. तीन तासांनी ४ वाजेच्या दरम्यान गॅस दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्यात यश. सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अपघातग्रस्त टँकर उड्डाणपुलावरून काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.