बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या 'कृष्णलीले'से स्टँडिंग ओवेशन; 'लिम्का बुक' मध्ये नोंद
By राम शिनगारे | Published: January 20, 2024 07:04 PM2024-01-20T19:04:35+5:302024-01-20T19:25:22+5:30
छत्रपती संभाजीनगरवासीय भारावले; नवजीवन मतिमंद विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा विक्रम
छत्रपती संभाजीनगर : कारागृहातील जन्मापासून ते महाभारतातील महत्त्वाच्या भूमिका हुबेहूब सकारणाऱ्या नवजीवन मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कृष्णलीला पाहून पाहण्यासाठी आलेले शहरवासीय अगदीच भारावून गेले होते. शेवटी तर सर्वांनी उभे राहून कलाकार असलेल्या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. निमित्त होते एमजीएम संस्थेतील रुख्मिणी सभागृहात सादर केलेल्या कृष्णलीला नाटिकेचे. ७० विद्यार्थ्यांच्या समूहाने सादर केलेल्या या नाटिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
नवजीवन सोसायटी फाॅर रिसर्च ॲण्ड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप्ड संस्था संचलित नवजीवन मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रुख्मिणी सभागृहात कृष्णलीला नाटिका सादर केली. त्यापूर्वी खासदार इम्तियाज जलील, एमजीएमचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, उद्योजक वर्षा जैन, प्रशांत शर्मा, एन. के. गुप्ता, कुमार, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने-कटके, संस्थेच्या अध्यक्ष शर्मिला गांधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या संघाने नाटिका सादर केली. नाटिका सादर करताना विद्यार्थी कशा पद्धतीने अभिनय करतात? तयारीनुसार रंगमंचावर सादरीकरण करता येते की नाही? ऐनवेळी काही विसरून गेल्यास पुढील स्टेप करता येईल का? अशी अनेक प्रश्न खचाखच भरलेल्या नाट्यगृहातील श्रोत्यांना पडली होती.
मात्र, पाठीमागील स्क्रीन सुरू असलेल्या नाटिकेचे हुबेहूब रुपांतरण कलाकारांनी केले. एकाही स्टेपमध्ये गडबड झाल्याचे दिसून आले नाही. कारागृहातील कृष्णाचा जन्म, वासुदेवाने गोकुळात आणून देणे, कृष्णाच्या लहानपणींच्या लिला, बासरीची किमया, कालिया नागाचा पराभव, करंगळीवर गोवर्धन पर्वत, कंसाचा वध, कृष्णाचा राज्याभिषेक, महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण, कृष्णाची भुमिका, महाभारतीत युद्धास्थळावरील अर्जुनाचे सारथ्य अशा विविध प्रकारांतील कृष्णलीला अगदी सहजपणे विद्यार्थ्यांनी साकारल्याचे दिसून आले. रंगमंचावर सादरीकरण होत असतानाच तितका प्रतीदास समाेर बसलेल्या श्रोत्यामधून मिळत असल्याचे दिसून आले. ही नाटिका त्र्यंबक कुलकर्णी आणि निला शहाणे यांनी बसवली होती.
समाजाने मदतीचा हात पुढे करावा : खासदार जलील
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी कृष्णलीला सादर करण्यापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एका घरात चार मुले असतील तर आई-वडिलांना सांभाळणे कठीण जाते. मात्र, नवजीवन संस्थेत बौद्धिक अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याचे काम अध्यक्षा शर्मिला गांधी यांच्यासह त्यांची टीम करीत आहे. या संस्थेच्या पाठीशी समाजातील प्रत्येक घटकाने उभे राहत मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही खासदार जलील यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात अध्यक्ष गांधी यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातील योजनाही मांडत विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचे आवाहन केले. संस्थेची माहिती मोनिका मुळे व श्वेता खिस्ती यांनी दिली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक यामिनी काळे व आश्विनी दाशरथे यांनी केले.