विकतचे टँकर अन् जारच्या पाण्यावर जगताहेत पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय
By साहेबराव हिवराळे | Updated: March 13, 2024 18:32 IST2024-03-13T18:31:13+5:302024-03-13T18:32:12+5:30
एक दिवस एक वसाहत: घरे बांधली टोलेजंग, रस्तेही गुळगुळीत; पण जवळपास दवाखाना नसल्याने गाठावे लागते शहर

विकतचे टँकर अन् जारच्या पाण्यावर जगताहेत पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय
छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय बाराही महिने टँकर आणि जार पाण्यावर कसेबसे जगत आहेत. महानगरपालिकेने बांधलेल्या जलकुंभात अधूनमधून अत्यल्प पाणी भरले जाते. पण वाढत्या लोकसंख्येला हे पाणी कमी पडतेय. यामुळे पिण्यासाठी जारचे पाणीच विकत घ्यावे लागते. सकाळी मुलांना शाळेत नेऊन सोडताना जपून जावे लागते. दवाखाना नसल्याने शहरात उपचारासाठी जावे लागते. कचरा सफाईकडेही कर्मचारी कानाडोळा करतात. त्यांना कुणाचा धाक नसल्याने अस्वच्छता पसरते. सिमेंटीकरणाने रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला व अपघातापासून बचाव करण्यासाठी अतिदक्षता बाळगावी लागते. कारण येेथे गतिरोधकच नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
१५ हातपंप नादुरुस्त
पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून लोकप्रतिनिधींच्या निधीमधून बोअरवेल घेण्यात आल्या आहेत. सुमारे १५ बोअरवेल तुटलेल्या असून, मनपाकडे स्वतंत्र विभाग असतानाही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. किमान उन्हाळ्यात तरी हे बोअरवेल दुरुस्त केल्यास नागरिकांची भटकंती टळेल.
- मिलिंद शेजूळ, नागरिक
गतिरोधक किंवा स्काय वॉक हवा
पडेगाव व आजूूबाजूच्या वसाहतीत जाताना हायवेवरून जाताना अत्यंत दक्षता बाळगावी लागते; कारण रस्त्यावर किरकोळ अपघात सातत्याने घडतात. काहींना मोठ्या वाहनाचा धक्का लागल्यास जीवही गमवावा लागतो. येथे वाहनाची गती रोखण्यासाठी गतिरोधक किंवा स्काय वॉक ब्रिज बनवावा, अशी नागरिक व पालकांची मागणी आहे.
- शेख लतीफ (नागरिक)
पाहुणे आले की पंचाईतच
नवीन योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, त्यात पाणीच आलेले नाही. सध्या तरी टँकर आणि जारच्या पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. चार पाहुणे आले की, मोठी पंचाईत होते. पाणीपुरवठा लवकर करावा.
-संतोष धनतोले, रहिवासी
सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस
सार्वजनिक स्वच्छतागृहाची मनपाने दुरुस्ती केलेली नसल्याने त्याचा वापर करणे शक्य नाही. येथे सफाई व पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
-बाळू शिंदे, रहिवासी
महिलांसाठी उपक्रम राबवावेत...
बचत गटाच्या महिलांना कौशल्य व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कामगार कुटुंबे या परिसरात मोठ्या प्रमाणात राहतात.
-डाॅ. रंजना शेजवळ, रहिवासी