विद्यापीठात राजीनामा सत्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:37 AM2017-11-04T01:37:06+5:302017-11-04T01:37:09+5:30
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात राजीनामा सत्र कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात राजीनामा सत्र कायम आहे. परीक्षा संचालकपदासाठी कुलगुरूंनी विद्यापीठातील बहुतांश प्राध्यापकांना विचारणा केली. मात्र, कोणीही पदभार स्वीकारला नाही. शेवटी डॉ. दिगंबर नेटके यांनाच दम देऊन पुन्हा पदभार स्वीकारण्यास भाग पाडले. या सर्व गोंधळामुळे राजीनामा सत्र कायम असून, विद्यापीठ प्रशासनाची दुरवस्था झाली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा डॉ. बी.ए. चोपडे यांनी ४ जून २०१४ रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. एस.पी. झांबरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस.टी. सांगळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला. यानंतर पदावर नेमलेल्या व्यक्तींमधील पहिला राजीनामा परीक्षा नियंत्रक व कुलसचिव असलेले कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांचा घेतला. हा राजीनामा विविध संघटनांच्या दबावामुळे घेण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता अशी वेळ आली आहे, की कोणत्याही पदाचा पदभार स्वीकारण्यास प्राध्यापक, अधिकारी तयार होत नाहीत. हे प्रशासनातील भयानक वास्तव आहे. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही. ज्यांना दिली जाते त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणीही जीव ओतून काम करण्यास तयार होत नाही, हे वास्तव आहे.
कुलगुरूंच्या साडेतीन वर्षांच्या अल्पशा कार्यकाळात तब्बल १४ कुलसचिव, ८ परीक्षा संचालक, ५ वित्त व लेखाधिकारी, ४ बीसीयूडी व विशेष कार्य अधिकारी, अशा संवैधानिक पदांवर व्यक्तींनी काम केले आहे, तर उर्वरित लहान-मोठ्या पदांचा अनेकांनी राजीनामा दिला असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.
सहा महिन्यांत यांनी दिले राजीनामे
डॉ. सतीश पाटील (विशेष कार्य अधिकारी), डॉ. दिगंबर नेटके (परीक्षा संचालक), डॉ. राजेश रगडे (परीक्षा संचालक), डॉ. सतीश दांडगे (परीक्षा संचालक), डॉ. प्रदीप दुबे (क्रीडा संचालक), डॉ. अशोक मोहेकर (संचालक, विद्यापीठ उपकेंद्र), डॉ. सचिन देशमुख (नॅक समन्वय आणि युनिक संचालक), डॉ. साधना पांडे (फॉरेन स्टुडंट सेल), डॉ. मदन सूर्यवंशी (वसतिगृह क्र. २ चे अधीक्षक), डॉ. विकास कुमार (वसतिगृह क्र. ३ चे अधीक्षक), प्रा. गिरिबाला बोंदले (विद्यार्थिनी वसतिगृह अधीक्षक), संजय शिंदे (वसतिगृह क्र. ५ चे अधीक्षक), डॉ. पुरुषोत्तम देशमुख (संचालक, छत्रपती अध्यासन केंद्र) आदींनी राजीनामा दिला आहे. यातील बहुतांश पदभार संबंधित विभागात कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी प्राध्यापक नेमले आहेत.
सोडून गेलेले प्राध्यापक व अधिकारी
विद्यापीठात कार्यरत असलेले, मात्र संधी मिळताच बाहेर पडलेल्यांमध्ये ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. बी.एस. वाघमारे, डॉ. अरुण खरात, डॉ. भीमराव भोसले आणि डॉ. गणेश यांचा समावेश आहे. आणखी काही जण बाहेरील संधीच्या शोधात
आहेत.
दोन अधिकारी राजीनाम्याच्या तयारीत
विद्यापीठातील प्रशासनात असलेल्या गोंधळामुळे आणखी दोन अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही अधिका-यांनी पूर्वीच राजीनामा दिला होता. मात्र, ते कुलगुरूंनी फेटाळले होते. परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्यामुळे हे अधिकारीसुद्धा कंटाळले आहेत. यात वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा समावेश आहे.