भावी १० गुरुजींवर रेस्टिकेटची कारवाई
By Admin | Published: June 12, 2014 12:53 AM2014-06-12T00:53:04+5:302014-06-12T01:38:01+5:30
लातूर : डीटीएड्. अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, बुधवारी इंग्रजीच्या पेपरमध्ये लातूर शहरातील एका परीक्षा केंद्रावर गाईडचा वापर करून नकला करताना १० भावी गुरुजींना बैठे पथकाने पकडले.
लातूर : डीटीएड्. अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, बुधवारी इंग्रजीच्या पेपरमध्ये लातूर शहरातील एका परीक्षा केंद्रावर गाईडचा वापर करून नकला करताना १० भावी गुरुजींना बैठे पथकाने पकडले. त्यांच्यावर रेस्टिकेटची कारवाई पथकाने केली आहे.
लातूर शहरातील व्यंकटराव परगे अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर डीटीएड्.च्या इंग्रजी विषयाची परीक्षा बुधवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेत १० परीक्षार्थी गाईडची पाने फाडून नकला करीत असताना बैठे पथकाच्या निदर्शनास आले. दरम्यान, बैठे पथकाचे प्रमुख मुख्याध्यापक भारत सातपुते, उपशिक्षणाधिकारी शोभा येळूरकर, विस्तार अधिकारी एस.डी. बिराजदार यांनी गैरप्रकार करणाऱ्या या परीक्षार्थ्यांच्या नकला व उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांच्यावर रेस्टिकेटची कारवाई केली आहे. पथकाने केलेल्या कारवाईचा अहवाल पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनाही पाठविण्यात आला आहे. आयुक्तांकडून या अहवालाची पडताळणी होणार असून, त्यानंतर पुढील किती परीक्षेला या विद्यार्थ्यांना निर्बंध घातले जातील, ते ठरणार आहे.
दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्र संचालक म्हणून ज्यांची नेमणूक या केंद्रावर करण्यात आली होती, त्यांना अचानक दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आले होते. तर या केंद्रावर दुसऱ्या केंद्र संचालकांची नियुक्ती केली. हा बदल परीक्षा सुरू होण्यापूर्वीच झाला होता. पण बदल कशामुळे केला, याबाबत उलटसुलट चर्चा परीक्षा केंद्रावर होती. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी...
व्यंकटराव परगे अध्यापक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गैरप्रकाराची एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, शिक्षण उपनिरीक्षक के.आर. शिंदे यांनी भेट दिली. परीक्षार्थी परीक्षा हॉलमध्ये आल्यानंतर त्यांची तपासणी केली नसल्याने बैठे पथकाला ही कारवाई करावी लागली. याबद्दल शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले.