औरंगाबाद जिल्ह्यातील २१ गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:00 PM2018-04-25T13:00:03+5:302018-04-25T13:04:16+5:30
२१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत पैठण व गंगापूर तालुक्यांतील ८ ग्रामपंचायती दत्तक घेतल्या असून, या ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या २१ गावांचा चेहरामोहरा बदलून येत्या तीन वर्षांत ही गावे ‘मॉडेल’ करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील पांगरा, जांभळी, म्हारोळा, पैठणखेडा आणि दिन्नापूर या ५ ग्रामपंचायती आणि या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १३ गावे, तर गंगापूर तालुक्यातील जांभाळा, दहेगाव आणि कणकोरी या ३ ग्रामपंचायती आणि ८ गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने ९ मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नियुक्त केले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. प्रामुख्याने या गावांत जि. प. शाळा, अंगणवाडी आणि स्मशानभूमी बांधकामे सुरूही झाली आहेत.
या गावांमध्ये विहित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण झाली पाहिजे, यासाठी जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर हे लक्ष ठेवून आहेत. २१ पैकी १० गावांमध्ये अंगणवाडी इमारती, ३ ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय इमारती आणि सर्व २१ गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. विकासकामांसाठी प्रत्येक गावाला ४ लाखाप्रमाणे सुमारे ८४ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे विकासकामांबरोबर त्या गावांतील जि. प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये लहान बालके, किशोरी मुली, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये आधुनिक वजनकाटा, रक्तदाब, मधुमेह तपासणी संच दिला जाणार आहे. ज्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींसाठी आरोग्य केंद्रात जाण्याची वेळ येणार नाही. गरोदर मातेच्या वजनात वाढ होते की नाही, याची तपासणीही याच ठिकाणी होणार आहे.
गावे जोडणार जिल्हा मार्गाला
अंगणवाडी तसेच शाळांसाठी प्रोजेक्टर, एलसीडी दिले जाणार आहेत. गावातील रस्ते, शौचालये, ड्रेनेज, सांडपाणी यावरही अन्य योजनांच्या माध्यमातून काम होणार आहे. ही गावे हगणदारीमुक्त व जलयुक्त शिवार झाली, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले, तर ही गावे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा रस्त्याला जोडली जाणार आहेत.