जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 'संभाजीनगर' नामांतराचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:57 PM2021-11-23T12:57:18+5:302021-11-23T12:58:41+5:30
विशेष म्हणजे भाजपच्या सदस्यांनी हा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी अनुमोदन दिले.
औरंगाबाद : शहराचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनेची अनेक वर्षांची मागणी आहे. याविषयी राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. मनपा आणि जि. प.च्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या जि. प.च्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विशेष म्हणजे भाजपच्या सदस्यांनी हा ठराव मांडला. त्याला शिवसेनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी अनुमोदन दिले. जि. प.ची सर्वसाधारण सभा अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टी. व्ही. सेंटर रस्त्यावरील मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पडली. या सभेत आयत्या वेळेचा विषय म्हणून भाजप सदस्य मधुकर वालतुरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करावे, असा ठराव मांडला. बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे यांनी या ठरावाला अनुमोदन देत, चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांगितले. शिवाय शहराचे नामांतर करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला आहे.
हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वालतुरे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. यासोबतच या ठरावाला अनुमोदन दिले. यानंतर सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. हा मंजूर ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्याकडे केली. जि. प.च्या २००९ साली झालेल्या एका सर्वसाधारण सभेत तत्कालीन सदस्यांनी संभाजीनगर नामांतर करण्याचा ठराव घेतला होता. जुना ठराव प्रलंबित असताना पुन्हा सर्व सभासदांनी याच विषयावर ठराव मंजूर केला.