नगराध्यक्षांसाठी वाहन घेण्याचा ठराव
By Admin | Published: June 21, 2017 11:27 PM2017-06-21T23:27:09+5:302017-06-21T23:31:57+5:30
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेतही नेहमीप्रमाणेच विषयपत्रिकेच्या वाचनानंतर तत्काळ मंजुरी दिली असून अवघ्या काही मिनिटांत ही सभा आटोपली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेतही नेहमीप्रमाणेच विषयपत्रिकेच्या वाचनानंतर तत्काळ मंजुरी दिली असून अवघ्या काही मिनिटांत ही सभा आटोपली. त्यानंतर मात्र काहीकाळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यात शहर विकास आराखड्याचा मुद्दा होता. परंतु तो विषय पटलावर नसल्याने त्याचा तपशील मिळू शकला नाही.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील सभेस उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी भूमिगत गटार योजनेचे वाढीव अंदाजपत्रक शासनास सादर करण्यास मंजुरी दिली. पूर्वी १२१ किमीची ही योजना होती. आता ती वाढीव वस्त्यांमुळे १५२ किमीची झाली आहे. तर बालक मंदिर शाळा चालविण्यासाठी न.प.च्या अस्थापनेवर शिक्षकच नाहीत. त्यासाठीही शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. नगराध्यक्षांसाठी वाहन खरेदी करायला मंजुरी देतानाच मुख्याधिकारी व उपनगराध्यक्षांनाही वाहन द्यावे, अशी सूचना काहींनी मांडली. याशिवाय विद्युत विभागासाठी वाहन, रमाई योजनेतील प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गतची शौचालये वस्तीतर संघास तीन वर्षांसाठी चालविण्यास देणे, विविध कामांना मुदतवाढ, नवीन कामे प्रस्तावित करणे, नवीन अग्नीशामक वाहन खरेदी, म.बसवेश्वर स्मृतिस्तंभ सुशोभिकरण, एनटीसीतील आरक्षण क्र.८८ मधील न. प. मालकीची जागा विकसित करणे, देवडानगर उद्यान, कल्याण मंडपम्, बनावतवाला हॉल भाडेतत्त्वावर चालविण्यास दे, १६ प्रभागात व मुख्य रस्त्यावर एलईडी दिवे लावणे, पाणीपुरवठा विभागास भाडेतत्त्वावर जीप लावणे, गाळे दुरुस्ती व हस्तांतरण आदी विषयांना मान्यता दिली.