नववर्षाला करा पाणंदमुक्तीचा संकल्प
By Admin | Published: March 24, 2017 11:46 PM2017-03-24T23:46:27+5:302017-03-24T23:47:59+5:30
बीड :गुढीपाडव्यास २८ मार्च रोजी उघड्यावर शौचास न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा पाणंदमुक्त करण्याच्या दृष्टीने शासकीय हालचाली प्रगतिपथावर असताना येत्या गुढीपाडव्यास २८ मार्च रोजी उघड्यावर शौचास न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
२ आॅक्टोबर गांधी जयंतीपूर्वी संपूर्ण जिल्हा पाणंदमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना काही आवश्यक सूचना दिल्या आहेत.
शनिवारी व सोमवारी सकाळी शालेय परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना शौचालय वापरण्यास आवाहन करून उघड्यावरील शौच करण्याचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. ज्यांच्याकडे शौचालय नसेल त्यांनी शेजारी, नातेवाईक, मित्र यांचे शौचालय वापरावे; परंतु उघड्यावर जाण्यास नकार द्यावा. याची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशीच व्हावी म्हणून मंगळवारपासून कधीही उघड्यावर शौच करणार नाही, असा संकल्प विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक व शिक्षकांनी करवून घ्यावा. यासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांत स्वच्छतेची जाणीव जागृती करावी व विष्ठेमुळे होणाऱ्या विविध आजारांची त्यांना माहिती द्यावी. हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. सीईओ नामदेव ननावरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)