‘लोकमत अॅस्पायर’च्या माध्यमातून पालक-विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
By Admin | Published: June 6, 2016 12:05 AM2016-06-06T00:05:51+5:302016-06-06T00:24:47+5:30
लातूर : ‘लोकमत’च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या शैक्षणिक उपक्रमाला
लातूर : ‘लोकमत’च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या शैक्षणिक उपक्रमाला शहरासह जिल्हाभरातील पालक-विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भेट दिली. लोकमत अॅस्पायर फेअरच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि प्रवेशासंदर्भात असलेल्या समस्या, संभ्रम यासह अनेक प्रश्नांची उकल यानिमित्ताने झाली आहे.
‘लोकमत’ने ३ ते ५ जून या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय, इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक सुविधा, संधी याबाबत एकाच छताखाली विद्यार्थी आणि पालकांना माहितीचे दालन उपलब्ध करून दिले. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस होता. गेली दोन दिवसांपासून या उपक्रमाला नामवंत व्यक्ती, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, पालकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली.
रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लोकमत’ व संगम हायटेक नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्य आणि महिलांना मोफत रोपांचे संगम नर्सरीचे संगमेश्वर बोमणे, लातूर टेक्सटाईलचे गजानन सावरगावे, संतोष धानोरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सकाळी डॉ. दत्ता आंबेकर, वैशाली देशमुख-दुंडिले यांचे मार्गदर्शन झाले. ‘बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?’ या विषयावर कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूरचे संचालक प्रा. शरद पवार यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि त्याच्या पद्धती कशा ठरवाव्यात, याविषयी प्रा. पवार यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
सायंकाळी सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूरचे प्रा.डॉ. शंकर नवले यांनी ‘करिअर इन इंजिनिअरिंग’ या विषयावर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी इंजिनिअरिंग शाखेचा आॅनलाईन प्रवेश अर्ज कसा भरावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रवेश अर्जाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या यावर त्यांनी विद्यार्थी व पालकांना माहिती दिली. इंजिनिअरिंगमध्ये असलेल्या संधी आणि आव्हानाविषयी प्रा.डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची आवड आणि निवड याचा प्रामुख्याने पालकांनी विचार करावा, असा सल्लाही पालकांना त्यांनी दिला.
जगूया आई-वडिलांची स्वप्ने... या विषयावर प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी सकाळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगच्या शाखेकडे विद्यार्थ्यांचा असणारा कल, पालकांची भूमिका याबाबत मोटेगावकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.