शेतकरी संपाला प्रतिसाद
By Admin | Published: June 2, 2017 12:39 AM2017-06-02T00:39:47+5:302017-06-02T00:40:17+5:30
जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जालना तालुक्यातील रोहनवाडी, रेवगाव, कुंबेफळ, इंदेवाडी, बाजीउम्रद, काजळा आदी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जालना मोंढ्यात सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला.
शहराच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच याच गावांतून शहरामध्ये दूध विक्रीस जाते. दूरवरच्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन न घेता शेतकरी अन्य पीक उत्पादनाकडे वळलेले असल्याने तेथून भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. शहरालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहर परिसरातील रोहनवाडी, इंदेवाडी, बेथलम, रेवगाव, कुंबेफळ, राममूर्ती, देवमूर्ती आदी गावांतून जालना मोंढ्यात भाजीपाला विक्रीस येतो. शेतकरी संपाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने काही काही जणांनी खरबूज विक्रीसाठी मोंढ्यात आणले. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनातून खरबूज
काढून रस्त्यावर फेकणे सुरु केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी संपाची तीव्रता फारशी जाणवली नसली तरी उद्यापासून शेतकरी पूर्णत: संपात उतरतील, असा दावा शेतकरी संघटनेचे बबनराव गवारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
तालुक्यातील रोहनवाडी येथील महिला बचत गटाने सुरु अरुनिमा गाय दूध गट ही दूध डेअरी बंद ठेवलीे. तर भाजीपाला उत्पादनक शेतकरी सुभाषराव तनपुरे, शंकर तनपुरे, उदयभान तनपुरे, रामकिसन मैंद, दत्ता गजर, नामदेव तनपुरे, बंडू तनपुरे हे संपात सहभागी झाल्याची माहिती बाळासाहेब तनपुरे यांनी दिली. काजळा येथे सकाळी भाजीविक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांनी गावातच रोखले. आजपासून कोणीही भाजीपाला तोडणार किंवा विक्रीसाठी न्यायचा नाही, असा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला. काजळा येथे जवळपास २०० लिटर दूध उत्पादन आहे. परंतु ते शहरात जात नाही, अशी माहिती संजय शेंडगे यांनी दिली. या संपात सहभागी होण्याचे आवाहन शेंडगे यांच्यासह विशाल मदनुरे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण पघळ, भरत खोटे, शिवाजी वाल्हुरे, प्रल्हाद पडूळ यांनी केले आहे. काजळा येथे वांगी, शेपुची भाजी, कोबी, पालक, मेथी, हिरवी मिरची अशा प्रकारचा ८ ते ९ पोते भाजीपाला उत्पादीत होतो. गुरुवारी सकाळी विक्रीसाठी जाणारा हा भाजीपाला गावातच थांबविण्यात आला. त्यासोबत वांग्याचे १४ कॅरेटही होते, असे शेंडगे यांनी सांगितले.
कुंबेफळ (ता.जालना) येथील ज्येष्ठ शेतकरी नेते बबनराव गवारे सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. शेतकरी संपाला गावातून प्रतिसाद मिळत आहे. गावातून शहरात विक्रीसाठी जाणारा भाजीपाला थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील मच्ंिछद्र मदन यांनी कोबी विक्री थांबवून शेतकरी संपात सहभाग घेतला. अन्य शेतकरीही संपात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजीउम्रद, ब्राह्मणखेडा येथेही शेतकरी संपाबाबत आवाहन करण्यात आल्याचे गौरव पडूळ यांनी सांगितले.
बदनापूर शहरात शेतकरी संघटना, शिवसेना व शेतकऱ्यांनी संपात सहभाग नोंदवित ५० लिटर दूध रस्त्यावर सांडवून दिले. या आंदोलनात देवजी जऱ्हाड, बाबासाहेब पवार, अंबादास कोळसकर, आसाराम शेळके, उद्धव खैरे, गणेश सिरसाठ, गणेश जऱ्हाड सहभागी झाले होते.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही राजकीय पक्षांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यावेळी संपूर्ण कर्जमुक्ती, डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा, शेतमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा आधारित दीडपट हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी के. एल. तांबोळी यांना देण्यात आले. आंदोलनात सुरेश काळे, बापूराव खटके, श्रीमंत खटके, पंडित गावडे, किरण तारख, बाबासाहेब गावडे, पांडुरंग उढाण, बंडूभाऊ मैद, पंढरीनाथ खटके, जगन खटके, दत्तात्रय खैरे, राधकीसन पवार सुभाष भोईटे आदी उपस्थित होते.