कोविड निवारणासाठी उद्योग क्षेत्राकडून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:02 AM2021-04-02T04:02:11+5:302021-04-02T04:02:11+5:30
औरंगाबाद : कोविडच्या निवारण्यासाठी मदत करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या आव्हानाला शहरातील नामांकित उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
औरंगाबाद : कोविडच्या निवारण्यासाठी मदत करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या आव्हानाला शहरातील नामांकित उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन हा पुढाकार घेतला आहे, अशी माहिती सीएआयएचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी दिली.
कोरोना निवारण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला उपकरणाची गरज असून ते उद्योग क्षेत्राकडून दिले जाऊ लागले आहे. सी.पी. त्रिपाठी यांचे पुत्र व ब्रह्म ग्रुपचे संस्थापक भावुक त्रिपाठी यांनी १ कोटींची यासाठी मदत केली आहे. या आर्थिक मदतीतून कोविड बाधित रुग्णांवर उपचार व लसीकरण मोहिमेस चालना मिळावी आणि कल्याणकारी सल्ला केंद्र विकसित व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
भावुक त्रिपाठी यांनी सांगितले की, सर्व स्तरातील बाधित व्यक्तींना आगामी काळात शुश्रूषा तसेच योग्य मार्गदर्शन कसे लाभेल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
एआयटीजी ग्रुपचे अध्यक्ष तथा सीएमआयएचे माजी अध्यक्ष राम भोगले आणि धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धुत यांनी फ़्लेक्स थेर्मोफिशर मशीन देण्याचे ठरविले आहे. या मशीनची किंमत २८ लाख रुपये आहे. हे मशीन आर. एन. ए. एक्स्ट्रॅक्शनसाठी वापरले जाते. जेणेकरून आरटीपीसीआर टेस्ट लवकर करता येते. याशिवाय फिलिप्स मेक २ आयसीयू व्हेंटिलेटर (अंदाजे किंमत १४ लाख रुपये) गरवारे पॉलिएस्टरतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष श्रीकृष्ण आमलेकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजकांनी प्रशासनाला मदत केल्याबद्दल उद्योजकांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू मानद सचिव सतीश लोणीकर तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्यांनी या दानशूर उद्योजकांचे आभार मानले. तसेच योग्यवेळी औरंगाबादवासीयांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद दिले.