गुटखा विक्रीवरील कारवाईसाठी मराठवाड्यात २३ जणांवरच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 04:35 PM2019-06-21T16:35:24+5:302019-06-21T16:36:18+5:30

परराज्यातील गुटखा रोखणे कठीण 

Responsibility for 23 people in Marathwada for gutka sale control | गुटखा विक्रीवरील कारवाईसाठी मराठवाड्यात २३ जणांवरच जबाबदारी

गुटखा विक्रीवरील कारवाईसाठी मराठवाड्यात २३ जणांवरच जबाबदारी

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात २१ कोटी ४८ लाखांचा गुटखा, पानसुपारी जप्तबीड जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा जप्त 

औरंगाबाद : मागील ७ वर्षांपासून राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. मात्र, अजूनही सर्रासपणे गुटखा विकला जात आहे. परराज्यातून मराठवाड्यात येणारा गुटखा, सुगंधित पानमसाला जप्ती व कारवाई करण्याची जबाबदारी अवघ्या २३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. तोकडे मनुष्यबळ हेच अन्न व औषध प्रशासनाची कमजोरी बनले आहे. तरीपण मागील वर्षभरात २१ कोटी ४८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यात सर्वाधिक गुटखा बीड जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. 

गुटखा आरोग्यास अपायकारक असल्याने २०१२ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखा,  सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्रीवर बंदी आणली. तेव्हा राज्यातील गुटखा उद्योग आसपासच्या परराज्यांत स्थलांतरित झाला. यास ७ वर्षे झाली; पण अजूनही राज्यात गुटखा सर्रासपणे विकला जात आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू विक्रीला येत आहे. परराज्यांतून होणारी आवक रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. जप्ती व कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर टाकण्यात आली आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास औरंगाबाद ५ अन्न सुरक्षा अधिकारी, जालना ४, बीड २, परभणी १, हिंगोली १, उस्मानाबाद ३, नांदेड ४ व लातूर येथे २, असे एकूण २३ अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. अपुरा अधिकारी वर्ग हीच या प्रशासनाची कमजोरी ठरत आहे.

१९९४-९५ या आर्थिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यासाठी १२ अन्न निरीक्षक कार्यरत होते. मात्र, त्यानंतर त्यांची संख्या घटत गेली. आजघडीला प्रत्येक तालुक्यासाठी १ म्हणजे मराठवाड्यात ७६ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेव्हाच कायद्याची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. अपुरा अधिकारी वर्ग असतानाही मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात २१ कोटी ४८ लाख ५५ हजार ६९० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारी जप्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. १०३ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, २०१२ पासून उच्च न्यायालयात अनेक खटले प्रलंबित आहेत. यामुळे मराठवाड्यात आजपर्यंत एकाही प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा जप्त 
अन्न व औषध प्रशासनाने मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात २६३ ठिकाणी कारवाई करून २१ कोटी ४८ लाख ५५ हजार ६९० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी जप्त केली. 

जिल्हा               कारवाई                 जप्तीची रक्कम 
औरंगाबाद             ३९             ७७ लाख २७ हजार ८२० रुपये
जालना                  ३०             ४४ लाख ९५ हजार २८७ रुपये
बीड                        ३१              १२ कोटी २७ लाख ७३ हजार २१५ रुपये
परभणी- हिंगोली    ६५             ३ कोटी १९ लाख ५२ हजार ५१७ रुपये
नांदेड                      ७८             २ कोटी ३६ लाख २२ हजार ३९२ रुपये
लातूर                      २०              ५४ लाख ७१ हजार ८४६ रुपये

Web Title: Responsibility for 23 people in Marathwada for gutka sale control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.