कोरोना लसीकरण यशस्वितेची जबाबदारी ग्रामदक्षता समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:05 AM2021-04-02T04:05:11+5:302021-04-02T04:05:11+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे लसीकरण ४५ वर्षांवरील नागरिकांना सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी गावातील लसीकरण समितीवर ...
औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचे लसीकरण ४५ वर्षांवरील नागरिकांना सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी गावातील लसीकरण समितीवर सोपवण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील, आशावर्कर, अंगणवाडीसेविका, तलाठी, कृषी सेवक, बीएलओ अशा सात जणांची ही ग्रामदक्षता समिती प्रत्येक गावात स्थापन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
डाॅ. गोंदावले यांनी प्रत्येक गावात लसीकरण १०० टक्के यशस्वी करण्यासाठी ही ग्रामदक्षता समिती गठित करण्याचे आदेश गुरुवारी दिले. जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायती अंतर्गतच्या गावांत ही समिती स्थापन करून प्रत्येकी ५० नागरिकांना लसीकरणाला प्रवृत्त करावे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना डाॅ. गोंदावले यांनी दिल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनील भोकरे यांनी सांगितले.