पालिकेची जबाबदारी वाढली
By Admin | Published: May 5, 2017 12:06 AM2017-05-05T00:06:23+5:302017-05-05T00:07:10+5:30
उस्मानाबाद : राज्यातील जालना, बीडसारख्या ‘अ’ वर्ग नगर पालिकांना मागे सारत उस्मानाबाद पालिकेने उत्कृष्ट पालिका म्हणून मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
उस्मानाबाद : राज्यातील जालना, बीडसारख्या ‘अ’ वर्ग नगर पालिकांना मागे सारत उस्मानाबाद पालिकेने उत्कृष्ट पालिका म्हणून मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या कामगिरीबाबत उस्मानाबाद पालिकेचा शुक्रवारी उत्कृष्ट पालिका म्हणून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान, केंद्राने देशातील स्वच्छ शहरांची यादीही जाहीर केली. यातही उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकाविला आहे.
जिल्हास्तरीय योजनेत मिळालेला निधी व त्याचा झालेला खर्च याबरोबरच २०१५-१६ मध्ये यशस्वीपणे राबविलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, २०१६-१७ मध्ये दुर्बल घटकांकरिता पालिकेने खर्च केलेला निधी आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून राबविलेल्या योजना तसेच स्वनिधीतून केलेल्या कामांचे मुल्यमापन आदी बाबींसह पालिकेची वसुली आणि इतर विविध घटकांचे निकष मानून मुल्यांकन केल्यानंतर उत्कृष्ट पालिकांची ही निवड करण्यात आली आहे. यात उस्मानाबाद पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली. तर दुसरीकडे देशातील स्वच्छ शहरांच्या यादीतही उस्मानाबादला स्थान मिळाले. या यादीतील टॉपटेनमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा क्रमांक लागला आहे. त्यानंतर पहिल्या स्वच्छ शंभर शहरांमध्ये नवीन मुंबईसह पुणे, मुंबई, शिर्डी, पिंपरी चिंचवड, अंबरनाथ आणि चंद्रपूर या शहरांनी क्रमांक पटकाविला तर १०० ते २०० या क्रमांकाच्या यादीत महाराष्ट्रातील १६ शहरांची वर्णी लागली. तर २०० ते ३०० या क्रमवारीत महाराष्ट्रातील अठरा शहरांना बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यामध्ये उस्मानाबादने २१९ वा क्रमांक पटकावित मराठवाड्यात नांदेड नंतर क्रमांक मिळविला आहे. याच यादीत मराठवाड्यातील परभणी शहर २२९ व्या, उदगीर २४० तर औरंगाबाद २९९ व्या क्रमांकावर राहिले असून, त्यानंतर ३०२ या क्रमांकावर बीड, ३१८ लातूर आणि ३६८ व्या क्रमांकावर स्वच्छ शहर म्हणून जालना पालिकेचा क्रमांक लागला आहे.
उस्मानाबाद पालिकेने मागील काही वर्षांपासून विविध स्तरावर कामांना गती दिलेली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकांनी उत्पन्न वाढीसाठी प्रॉपर्टीचे पुनर्सर्वेक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. उस्मानाबाद पालिकेने हे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच केलेले आहे. अशाच पध्दतीची इतर कामेही अत्यल्प कालावधीत मार्गी लावण्यात यश आल्याने उस्मानाबादचा उत्कृष्ट पालिका म्हणून गौरव झाला. या पुरस्कारामुळे उस्मानाबाद पालिकेतील पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, येणाऱ्या काळात स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक बाबींना गती देण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.