जबाबदार नेतेच बोराळकरांच्या पराभवास कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:04 AM2020-12-31T04:04:36+5:302020-12-31T04:04:36+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियातून काहींनी जातीवाचक प्रचार करून ही निवडणूक वादात अडकवली. परिणामी एवढी ...

The responsible leader caused the defeat of Boralkar | जबाबदार नेतेच बोराळकरांच्या पराभवास कारणीभूत

जबाबदार नेतेच बोराळकरांच्या पराभवास कारणीभूत

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियातून काहींनी जातीवाचक प्रचार करून ही निवडणूक वादात अडकवली. परिणामी एवढी मोठी ताकद असतानाही भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला. काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सुपारी घेतल्याप्रमाणे पराभव होण्यासाठीच कामे केल्याची भावना पक्ष निरीक्षक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर नेते, पदाधिकाऱ्यांनी बुधवारी व्यक्त केली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी बावनकुळे शहरात आले आहेत. शहरातील जालना रोडवरील एका हाॅटेलमध्ये बावनकुळे यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. उमेदवारासह सर्व प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पराभूत उमेदवार बोराळकर यांनी सर्वांत शेवटी पराभवाची कारणे त्यांना सांगितली.

भाजपाची विभागात ताकद असताना पराभव झालाच कसा, यासंदर्भात बैठकीत मंथन झाले. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; परंतु नेत्यांनी काय केले, कोण कुठे कमी पडले याची माहिती बावनकुळे यांनी घेतली. पक्षाला दोन ते तीन जिल्ह्यांतून मोठा फटका बसला आहे. संघटनेत सुशिक्षित पदाधिकाऱ्यांची फौज असताना पराभव झाला. मतदान कमी का पडले, जातीवादावर निवडणूक नेण्यासाठी सोशल मीडियातून कुणी व कसा प्रचार केला, या सगळ्या बाबींची ग्रामीण आणि शहरी पदाधिकाऱ्यांकडून बावनकुळे यांनी माहिती घेतली.

यासंदर्भात बावनकुळे यांन विचारले असता त्यांनी सांगितले की, विभागात जिल्हानिहाय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.

निवडणुकीच्या काळात मराठा, ब्राम्हण, ओबीसी अशा पध्दतीने पक्ष उमेदवाराविरोधात तेढ निर्माण केली. सोशल मीडियातून वातावरण खराब केले. त्याला कुणीही थोपविले नाही. पक्षनेतृत्वातील काही जणांच्या आवाक्यात परिस्थिती असताना त्यांनी कुणाला समज दिली नाही. केवळ माजी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच सर्व काही केल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्याकडे व्यक्त केली.

चौकट...

जिथे पक्षाची ताकद तिथेच मतदान कमी

बीड जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद असताना तेथून मतदान कमी झाले, अशी माहिती बैठकीत चर्चेला आली. बीड जिल्ह्यात ४५ हजार मतदान झाले. त्यापैकी ३० हजार मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गेले. उरलेल्या १५ हजारांत भाजपासह सर्व उमेदवार राहिले. यातून लक्षात येते की, कुणी कुणाचे काम केले. आमदार, खासदार, केंद्रीय राज्यमंत्री असताना भाजपाचा दारूण पराभव झाल्याचे मत उमेदवारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्यासमोर मांडल्याचे भाजपा गोटातून सांगण्यात आले.

Web Title: The responsible leader caused the defeat of Boralkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.