उर्वरित आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:33 AM2017-11-16T00:33:14+5:302017-11-16T00:33:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : येथील पुरवठा विभागात गतवर्षी झालेल्या धान्य घोटाळ्यातील उर्वरित ५ खाजगी आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पुरवठा विभागात गतवर्षी झालेल्या धान्य घोटाळ्यातील उर्वरित ५ खाजगी आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक केली जाईल व शासकीय अधिकाºयांच्या अटकेसंदर्भात वरिष्ठस्तरावरून येणाºया मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
परभणीतील पुरवठा विभागाच्या गोदामातून ४ कोटी ९५ लाख रुपयांचे धान्य गायब झाल्या प्रकरणात १३ आॅगस्ट २०१६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलीस तपासात धान्य अपहराची रक्कम २८ कोटींपर्यंत गेली़ आरोपींची संख्या दोनवरून ३७ पर्यंत गेली़ या प्रकरणातील २२ आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली असून, या सर्वच आरोपींना जामीन मिळालेला आहे़ उर्वरित १५ पैकी एका आरोपीचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ शासकीय अधिकाºयांचा आरोपीत समावेश आहे़ इतर ५ खाजगी आरोपींनाही पोलिसांनी अटक केलेली नाही़ या प्रकरणाचा प्रारंभी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपास केला़ त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे हा तपास वर्ग झाला़ त्यांच्या काळात फारशी तपासाला गती मिळाली नाही़ अशातच परभणीचे तहसीलदार कडवकर व पानसरे यांच्यात खा़ राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी वादावादी झाली़
त्यामुळे पानसरे यांनी हा तपास आपल्याकडून काढून घ्यावा, अशी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांना मागणी केली़ त्यानुसार हे प्रकरण तपासासाठी हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ या अनुषंगाने गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या प्रकरणात परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी बाजार समिती, विभागीय आयुक्त कार्यालय आदींकडून काही माहिती आवश्यक होती़ ती माहिती मागविण्यात आली आहे़ अन्यही काही पुराव्यांची जमवाजमव केली जात आहे़ या प्रकरणातील ५ खाजगी आरोपींना नोव्हेंबर अखेरपर्यंत अटक केली जाईल़ ९ शासकीय अधिकाºयांच्या अटकेसंदर्भात वरिष्ठ पातळीवरून ज्या काही सूचना येतील, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे गुंजाळ यांनी सांगितले़ त्यामुळे आता गुंजाळ यांच्या चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़