घृष्णेश्वर मंदिर, तीर्थकुंडांचा केला हाेता जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:03 AM2021-05-31T04:03:26+5:302021-05-31T04:03:26+5:30
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर आणि शिवालय तीर्थकुंडांचा जीर्णोद्धार केला होता. शेकडो वर्षांपूर्वी ...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर आणि शिवालय तीर्थकुंडांचा जीर्णोद्धार केला होता. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी केलेली ही कामे आजही चांगल्या स्थितीत असून, हजारो भाविक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
वेरूळ गावाला धार्मिक व पर्यटनदृष्ट्या ऐतिहासिक असे महत्त्व आहे. या ठिकाणी १६९१ मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी शिवालय तीर्थकुंडाचा जीर्णोद्धार केला असल्याचा उल्लेख आढळून येतो. यासोबतच अहिल्याबाईंनी त्यांच्या सासू गौतमाबाई तथा बायजाबाई यांच्या स्मरणार्थ श्री घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो. वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या पाटीलकीचे गाव. घृष्णेश्वर हे त्यांचे कुलदैवत. आपल्याला कीर्ती व संपत्ती याच कुलदैवतेच्या कृपेने प्राप्त झाली, या श्रद्धेपोटी या घराण्यातील मालोजीराजे भोसले यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी केल्याचा उल्लेख येथील भांडार गृहावरील शिलालेखात आढळून येतो. वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडासमोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड अशी कमानही आपल्यास पाहायला मिळते.
--- फोटो
300521\30_2_abd_33_30052021_1.jpg
अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेले वेरुळ येथील शिवालय तीर्थकुंड.