निकाल लागला; पण गुणपत्रिका मिळणार कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:02 AM2021-01-20T04:02:57+5:302021-01-20T04:02:57+5:30
औरंगाबाद : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप ...
औरंगाबाद : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. गुणपत्रिका हस्तगत करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा परीक्षा विभाग महाविद्यलयाकडे, तर महाविद्यालय विद्यापीठाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे.
यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतीम सत्राच्या परीक्षा घेतल्या. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांचा निकाल तब्चल साडेतीन- चार महिन्यांनी घोषित करण्यात आला. निकाल जाहीर करण्याची जबाबदारी विद्यापीठाने पार पाडली; पण अजुनही बी.ए., बीएस्सी, बीकॉम तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. या विद्याशाखांचे विद्यार्थी रोज महाविद्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, विद्यापीठाकडून गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, असे सांगून विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जाऊन गुणपत्रिकांविषयी माहिती विचारली, तर त्या महाविद्यालयांकडे देण्यात आल्याचे सांगितले जाते. महाविद्यालयांकडे गुणपत्रिका पोहोचल्या नाहीत, यावर विद्यापीठातून गुणपत्रिका घेऊन जाण्याचे काम महाविद्यालयांचे आहे. त्यांनी नेल्या नसतील, असे उत्तर मिळते. या टोलवाटोलवीत विद्यार्थी त्रस्त होत आहेत.
चौकट.....
सोमवारपर्यंत सर्व गुणपत्रिका मिळतील
गुणपत्रिकांना विलंब का होतोय, यासंदर्भात विद्यापीठ परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक योगेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सध्या बीए, बीकॉम व बीएस्सीच्या गुणपत्रिकांची छपाई सुरू आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव होते. निकालाची दुरुस्ती करण्यास वेळ लागला. सर्वांचे निकाल व गुण प्राप्त झाल्यानंतर आता गुणपत्रिकांची छपाई केली जात आहे. सोमवारपर्यंत सर्व अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका मिळतील.