कोरोनामुळे दहावीचा निकाल पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:02 AM2021-07-17T04:02:17+5:302021-07-17T04:02:17+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा दहावी परीक्षेचा निकाल पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या २५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी ...
औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा दहावी परीक्षेचा निकाल पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या २५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी बोर्डाकडे पाठवले नाही. तर मूल्यांकन ऑनलाइन भरलेल्यांमधून ५६१ विद्यार्थी वगळता ६५ हजार १५४ (९९.१४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्वरित विद्यार्थ्यांचा राखीव निकाल त्रुटींची पूर्तता केल्यावर देण्यात येणार असल्याचे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ९०४ शाळांतून ६५ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ६५ हजार ७१५ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांकडून बोर्डाला प्राप्त झाले. त्यातून ६५ हजार १५४ (९९.१४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६२ हजार ९०४ (९९.९७ टक्के) नियमित तर २,२५० (८०.५० टक्के) पुनर्परीक्षार्थ्यांचा समावेश आहे. औरंगाबाद विभागात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील होते. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात औरंगाबाद अव्वल असून, पुनर्परीक्षार्थ्यांत इतर जिल्ह्यांपेक्षा कमी निकाल लागला आहे. मूल्यांकन दाखल केलेल्यांपैकी केवळ ५६१ विद्यार्थ्यांशिवाय इतर सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. विषेश म्हणजे या वर्षी प्रावीण्य श्रेणीत तब्बल ३३ हजार ११६, प्रथम श्रेणीत २६ हजार ८२८ विद्यार्थी तर ७८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत. ३५,०३५ मुले तर २७,८७९ मुली दहावीत उत्तीर्ण झाल्या असून, दोन्ही गटांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९७ टक्के असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
---
निकाल दिसेना! पालक, विद्यार्थी, शिक्षकांचा हिरमोड
दहावी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी सर्फिंग केले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना निकाल दिसू शकला नव्हता. विद्यार्थी शाळांतील शिक्षकांना फोन करून निकालाबद्दल विचारणा करीत आहेत. मात्र, निकाल डाऊनलोड होत नसल्याच्या अडचणींना शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी अशी समस्या आली नव्हती, असे माॅरल किड्स हायस्कूलचे संदीप जैस्वाल म्हणाले. तर पालकांना अडचणी येत आहेत. मात्र, राज्य मंडळाची वेबसाईट आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर निकाल दिसेल, असे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने म्हणाल्या.
---
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी पास
नियमित विद्यार्थी
औरंगाबाद - मुले - मुली
मूल्यांकन - ३५,०४३ - २७,८७६
उत्तीर्ण - ३५,०३५ - २७,८७९
टक्केवारी - ९९.९७ - ९९.९७
----
पुनर्परीक्षार्थी
औरंगाबाद - मुले - मुली
मूल्यांकन -२,१२९ - ६६६
उत्तीर्ण - १,५७६ - ४८६
टक्केवारी - ८२.८५ - ७२.९७
---
श्रेणीनिहाय
श्रेणी - नियमित विद्यार्थी - पुनर्परीक्षार्थी
प्रावीण्य श्रेणी - ३३,११६ - २२
प्रथम श्रेणी - २६,६२८ - ९०
द्वितीय श्रेणी - ३,०८२ - १२८
उत्तीर्ण श्रेणी - ७८ - २,०००
---
जिल्हा - शाळा - उत्तीर्ण विद्यार्थी
औरंगाबाद - ९०४ - ६५,१५४
जालना - ३९८ - ३१,३१२
बीड - ६५२ - ४२,३०१
परभणी - ४२५ - २८,४२३
हिंगोली - २१६ - १६,२०५