चार राज्यांचे निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागणार, नंतर भाजपमध्ये मोठी फूट पडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:16 PM2018-12-08T23:16:37+5:302018-12-08T23:17:10+5:30
चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद : चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. दुसरीकडे त्यांंनी लोकसंख्येच्या निम्मे म्हणजे ६० टक्क्यांच्या प्रमाणात ओबीसींना ३० टक्के आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.
सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये ते सकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. नरेंद्र मोदी खासदारांनाही कसे बोलू देत नाहीत. ‘नोकरी’(पदे) टिकविण्यासाठी मोठमोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजुरी करतात याचे अनेक किस्से यावेळी पटोले यांनी सांगितले. जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले, अब आप हमको सीखायेंगे क्या? कुणालाच बोलू दिले नाही. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीच राजीनामा देऊन बाहेर पडलो, अशी कहाणी त्यांनी कथन केली.
महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय, अशी टीका करीत या मंडळींनी महाराष्ट्राचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलून देशपातळीवर मार्केटिंग करीत फिरत आहेत की, महाराष्टÑात पाणीच पाणी आहे. मग तरीही १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे काय सुरूआहेत? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
मराठवाड्यातून १,२५० उद्योग गेले. हा सरकारी आकडा आहे. भरतीऐवजी कर्मचारी ४० टक्क्यांवर आणून ठेवले. दरवर्षी पाच लाख नोकऱ्यांचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. नोकºया दिल्या तर नाहीतच पण त्या खाल्ल्या, असा आरोप त्यांनी केला.
देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा....... चौकट
आतापर्यंत ही भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. माणसांना जाती-जातीत विभागून ठेवत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली. काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
या पत्रपरिषदेस श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.