नियामक समित्यांनी खातरजमा केल्यानंतरच निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:02 AM2021-07-10T04:02:12+5:302021-07-10T04:02:12+5:30
औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या निकालांचा गोंधळ थांबविण्यासाठी विद्यापीठाने आता ‘निकाल नियामक समित्या’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ...
औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या निकालांचा गोंधळ थांबविण्यासाठी विद्यापीठाने आता ‘निकाल नियामक समित्या’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, नियामक समित्यांनी खातरजमा केल्यानंतरच परीक्षा विभागाला यापुढे विविध विद्याशाखांचे निकाल जाहीर करण्याची मुभा राहील.
उच्चशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षांचे आयोजन केले. यामध्ये सुरुवातीला थोड्याफार तांत्रिक अडचणी सोडल्या तर राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे ऑनलाइन परीक्षेत यशस्वी राहिले आहे. मात्र, यावेळी बी.कॉम प्रथम सत्र वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाच्या पेपरमध्ये ११ हजारांपैकी अवघे १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांनी ओरड केली. विशेष म्हणजे, परीक्षा विभागाने या विषयाचा सलग तीनवेळा वेगवेगळा निकाल जाहीर केल्यामुळे गोंधळात वाढ झाली.
दरम्यान, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी तथ्यशोधनासाठी तडकाफडकी एक उपसमिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार परीक्षा मंडळाच्या (बीओई) बैठकीत अन्य विषयांच्या गुणांच्या सरासरीएवढे गुणदान करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेरनिकालमध्ये दहा हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तथापि, जुन्या विद्यापीठ कायद्यामध्ये निकाल नियामक समितीची तरतूद होती. ती आता नवीन कायद्यात नाही. मात्र, कुलगुरु आपल्या अधिकारात अशी समिती स्थापन करू शकतात. त्यानुसार सर्व विद्याशाखांच्या अशा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये संबंधित विद्याशाखेचे अधिष्ठाता, त्याच विद्याशाखेचे वरिष्ठ प्राध्यापक व परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. प्रत्येक विद्याशाखेसाठी अशी समिती कार्यरत राहील. निकाल जाहीर करण्यापूर्वी तो नियामक समितीसमोर पडताळणीसाठी ठेवला जाईल. समिती सदस्य गुणदानाची पद्धत अर्थात विद्यार्थ्यांना जास्त गुण अथवा कमी गुण देण्यात आले आहेत का? विहित पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती का? योग्य प्रकारे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली आहे का आदींची बारकाईने पडताळणी करतील. पडताळणी केल्यानंतरच निकाल जाहीर करण्यास परीक्षा व मूल्यमापन विभागाला हिरवा कंदील दाखवला जाईल.
चौकट....
बी.कॉमचा चौथ्यांदा निकाल जाहीर
बी.कॉम प्रथम वर्षाच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाचा दोन दिवसांपूर्वी चौथ्यांदा निकाल जाहीर करण्यात आला. या विषयाची परीक्षा ११ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी दिली होती. सुरुवातील फक्त १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाल्यास सरासरी गुणांनुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे अधिकार परीक्षा मंडळाला आहेत. त्यानुसार आता दहा हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.