सेवानिवृत्त चालक टाकणार ‘एसटी’चा गिअर ! करार पद्धतीवर होणार नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 03:43 PM2022-01-11T15:43:06+5:302022-01-11T15:44:41+5:30
माजी चालक ‘एसटी‘चे स्टिअरिंग पुन्हा हाती घेण्यास उत्सुक
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसाेय होत आहे. या सगळ्यात एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची तयारी केली आहे. त्याला औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक माजी चालक एसटीचे स्टिअरिंग पुन्हा हाती घेण्यासाठी पुढे येत आहेत.
राज्यभर एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ५ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. जाहिरात प्रसिद्ध होताच अनेक माजी चालकांची पावले एसटी महामंडळाच्या कार्यालयाकडे वळली आहेत. आतापर्यंत ३६ माजी चालकांनी अर्ज केले आहेत. ही संख्या रोज वाढत आहे. परंतु अशा प्रकारे माजी चालक घेण्यावर आंदोलनात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सेवानिवृत्त झालेल्यांना कसे घेता येईल, त्यांच्या प्रशिक्षणाचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
..यांना मिळणार नोकरी
चालक म्हणून रुजू होण्यासाठी वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे. एसटी महामंडळातील सेवाकाळात अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघात झालेला नसणे, कर्मचारी हा शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त झालेला नसावा. चालकाकडे अवजड वाहन चालन परवाना वैध असणे गरजेचे आहे. तसेच पीएसव्ही बिल्लाही आवश्यक आहे.
महिन्याचा पगार २० हजार
कारपद्धतीवरील चालकपदासाठी २० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. याशिवाय कोणतेही भत्ते व अन्य लाभ देय राहणार नाही. इच्छुक चालक ते ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले, त्या विभागांमध्ये करारपद्धतीवर अर्ज करू शकत आहेत.
रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू
सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्यासाठी अर्ज येत आहेत. आतापर्यंत ३६ जणांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यांना रुजू करून घेण्यासंदर्भात पुढील आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण चालक -१०७२
सध्या कामावर हजर चालक -१३०
कोणत्या आगारातून किती बसेस रस्त्यावर?
आगार- बसेस रस्त्यावर
सिडको -२९
मध्यवर्ती-४१
पैठण-१७
सिल्लोड-४
वैजापूर-५
कन्नड-२३
गंगापूर-३
सोयगाव-४