सत्कार समारंभातच पोलीस अधिकाऱ्यावर निवृत्त कर्मचाऱ्याचा प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:48 PM2022-06-23T14:48:09+5:302022-06-23T14:48:50+5:30

जीवघेणा हल्ला झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची परिस्थिती चिंताजनकच, वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाही आरोपीचा अधिकाऱ्यावर पुन्हा हल्ला

Retired police officer's assault on a police officer during a reception; The nature is worrisome | सत्कार समारंभातच पोलीस अधिकाऱ्यावर निवृत्त कर्मचाऱ्याचा प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

सत्कार समारंभातच पोलीस अधिकाऱ्यावर निवृत्त कर्मचाऱ्याचा प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक

googlenewsNext

औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केल्यानंतर त्यांच्यावर अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्या ठिकाणाहून एमजीएम हॉस्पिटलमध्ये केंद्रे यांना मंगळवारी हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून, आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. दरम्यान, हल्ला करणारा आरोपी मुजाहेद शेख यास २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जिन्सी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यास तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हद्दीतील नागरिकांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल निरीक्षक केंद्रे यांच्या सत्काराचे आयोजन ठाण्याच्या आवारातच करण्यात आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व जण आपसात चर्चा करीत उभे होते. त्याच वेळी स्वेच्छानिवृत्ती घेतलेला पोलीस कर्मचारी शेख मुजाहेद शेख उस्मान (५५, रा. कटकट गेट) हा त्या ठिकाणी आला. त्याने निरीक्षक केंद्रे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यास जाब विचारला असता त्याने पाठीमागील खिशात ठेवलेला चाकू काढून थेट एक वार छातीत केला. दुसरा वार पोटावर केला. तिसरा वार करताना केंद्रे यांनी हात पकडल्यामुळे तो वार हातावर बसला. यात त्यांच्या अंगठ्याजवळील नस कापली गेली. केंद्रे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाला. हा रक्तस्त्राव बाहेर होण्यासह अंतर्गतही झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आता एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त दवाखान्यात बसून
निरीक्षक केंद्रे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी उपचार सुरु असलेल्या दवाखान्यात धाव घेतली. त्या ठिकाणी पोलीस आयुक्त मध्यरात्रीपर्यंत बसून होते. शहरातील इतरही डॉक्टरांशी संपर्क साधून उच्च दर्जाचे उपचार मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. आयुक्तांसह दोन उपायुक्त, सहायक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षकही दवाखान्यात बसून होते.

घाटी रुग्णालयात सहायक उपनिरीक्षकावर हल्ला
आरोपी शेख मुजाहेद यास वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आले होते. त्यास नेत असताना घाटीच्या बाहेर मुजाहेद याने सहायक पोलीस उपनिरीक्षक नजीर खान सुबान खान पठाण यांची कॉलर पकडून दवाखान्यात घेऊन का जात आहेत, असा सवाल उपस्थित केला. तसेच त्यांच्या शर्टच्या गुंड्या तोडून टाकत मारहाण केली. ते जखमी झाले. जिवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपीचे अनेक कारनामे
मुजाहेद याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत अरेरावी करीत होता. महिलांशी आक्षेपार्ह बोलत हाेता. त्याचे तक्रारदारासोबत भांडण झाल्यानंतर त्याने संबंधितांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र निरीक्षक केंद्रे यांनी त्याची मागणी फेटाळली. त्यामुळे केंद्रे यांच्याविषयी त्याच्या मनात राग होता. तसेच केंद्रे यांनी त्याची तक्रार घेण्याच्या ठिकाणावरून बीटमध्ये बदली केली होती. त्यामुळे चालू वर्षामध्ये तो वैद्यकीय कारणांनी सतत रजेवर जात होता. याशिवाय त्यास गुंगीकारक गोळ्या, दारूचेही व्यसन आहे. मंगळवारीही गोळ्या खाऊन आल्यानंतर नशेतच त्याने केंद्रे यांच्यावर हल्ला चढवला.

Web Title: Retired police officer's assault on a police officer during a reception; The nature is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.