मोबाइल ग्राहकांची वापसी, छत्रपती संभाजीनगरात ‘बीएसएनएल’च्या ५३ हजार सिमकार्ड्सची विक्री
By साहेबराव हिवराळे | Published: August 20, 2024 07:51 PM2024-08-20T19:51:40+5:302024-08-20T19:53:06+5:30
‘फोर-जीचा बोलत राहा धमाका’ ठरतोय ग्राहकांना फायदेशीर
छत्रपती संभाजीनगर : खासगी कंपन्यांच्या मोबाइल सेवांचे दर वाढल्यानंतर खासगी मोबाइल सेवा घेणारे अचानक बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) वळले आहेत. १ ते ३१ जुलैपर्यंत सुमारे ५३ हजार सिमकार्ड विकले गेले. १ ऑगस्ट ते १२ ऑगस्टपर्यंत सुमारे २७ हजार सिमकार्ड विकले गेले आहेत. एकूण दीड महिन्यात सुमारे ७० हजार सिमकार्ड विक्री झाली आहे.
एक काळ असा होता, बीएसएनएलकडे ग्राहक फिरकत नव्हते; पण आता याला सोन्याचे दिवस आले आहेत. बीएसएनएलने ‘मौका पाहून चौकार’ ठोकत फोर-जीचा ‘बोलत राहा’ ही योजना जाहीर केल्याने हा फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्टअखेरपर्यंत हा आकडा लाखाच्या घरात जाईल, असे संकेत मिळत आहेत.
जुलै महिन्यापासून सातत्याने वाढणारे ग्राहक विविध खासगी कंपन्यांचे सिम सरेंडर करताना फायबर आणि ब्रॉडबँड, ओटीटी सेवा घेताना बीएसएनएल फायदेशीर ठरत आहे का? याचीही ही तपासणी करत आहेत. याशिवाय विविध भागांतील सिग्नल स्ट्रेंग्थ, स्पीड तपासून चोखंदळपणाही दाखवत आहेत.
सिम बदलण्याची गरज नाही फोर-जीसह आता फाइव्ह-जीची सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे. मजबूत आणि स्थिर नेटवर्क कनेक्शन असणे खूपच आवश्यक आहे. मजबुतीकरण जोरदारपणे सुरू आहे. फोर-जी सिम नवीन ॲप्लिकेशनमुळे ५जीमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. तुम्हाला सर्व सोयीनुरूप त्याची उपयुक्तता ठरणार आहे. दि. ११ ऑगस्टपर्यंत २७ हजार नवीन सिमची विक्री झाल्याने ग्राहकांची पसंती वाढत आहे.
-संजयकुमार केशरवानी, महाप्रबंधक, बीएसएनएल, छत्रपती संभाजीनगर