सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

By विकास राऊत | Published: October 25, 2022 12:42 PM2022-10-25T12:42:46+5:302022-10-25T12:45:06+5:30

पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागणार, अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

Return rains hit 20 lakh hectares in Marathwada; It will take a week to complete the Panchnama | सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

सलग चौथ्यावर्षी खरीप हंगाम हिरावला; मराठवाड्यात परतीच्या पावसाचा २० लाख हेक्टरला फटका

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. प्राथमिक अंदाज अहवालानुसार विभागात सुमारे २० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण हाेण्यास आठवडा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत विभागात अतिवृष्टीमुळे ७ लाख ३८ हजार ७५०.३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे,परंतु अतिवृष्टी न झालेल्या भागात ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरचे नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच विभागात प्राथमिक पंचनाम्यानुसार २० लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली आहेत,अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. सध्या तरी एकूण ३१ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षीही पावसाने खरीप हंगाम हिरावून घेतला. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यांमुळे हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या दिवाळीवर दु:खाचे सावट आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, बीड वगळता इतर सहा जिल्ह्यांत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीपोटी सरकारने १,००८ कोटी रुपयांचे अनुदान सप्टेंबरमध्येच वितरित केले होते. हे अनुदान वाटप होत नाही,तोच विभागात पुन्हा पावसाचा जोर वाढला. दरम्यान,सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ५९९ कोटींची मदत जाहीर केली. गोगलगायीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ९८ कोटींची मदत देण्यात आली. शासनाने मराठवाड्यासाठी सुमारे १७०५ कोटी रुपये देऊ केले आहेत.

नुकसान क्षेत्र वाढण्याची शक्यता
औरंगाबाद जिल्ह्यात सप्टेबर,ऑक्टोबर या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक ४ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित सात जिल्ह्यात १५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरूच आहे. बहुतांश भागातील शेतात अद्याप पाणी असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास आठवडा लागेल.

पाऊस थांबला थंडीची चाहूल
विभागात २१ ऑक्टोबर पाऊस थांबला आहे. एकूण ६७९ मिली मीटरच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९११ मि.मी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या १२५ टक्के असून,सीतरंग या चक्रिवादळामुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान,हवामानात बदल झाला असून,थंडी जाणवू लागली आहे.

Web Title: Return rains hit 20 lakh hectares in Marathwada; It will take a week to complete the Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.