परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:08 PM2019-10-23T13:08:15+5:302019-10-23T13:18:12+5:30
या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
औरंगाबाद : जुलै, आॅगस्टमध्ये सर्वांना तरसायला लावणाऱ्या वरुणराजाने जाता जाता बहुतेक सर्वांना खुश करून टाकले. या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या पावसाचा रबी पिकांनाही फायदा होणार आहे. मात्र काहीशा चुकीच्या वेळी त्याच्या आगमनाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे वाटोळे करून बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. नांदेड जिल्ह्यात पुरामुळे एक दुचाकीस्वार पुलावरील पुरात वाहून गेला. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात अतिवृष्टी झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी
औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगाव, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, पैठण, खुलताबाद, फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यात मंगळवारी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक परतीच्या पावसाने हजेरी लावली.विशेष म्हणजे जिल्ह्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून यामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून मका, बाजरी, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.
या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हिंगोलीत पिकांचे नुकसान
हिंगोली : जिल्ह्यात शनिवार व रविवारी विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मंगळवारीही अनेक ठिकाणी पाऊस झाला. मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. हिंगोली शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूरीचे मोठे नुकसान झाले आहे. सेनगाव, वसमत, हट्टा, जवळा बाजार, औंढा नागनाथ, येहळेगाव आदी भागांत पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. अशातच आलेल्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले आहे. तसेच ज्वारीही काळी पडली आहे. रबी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस जरी उपयोगी असला तरी खरिपातील पिके हाता- तोंडाशी आल्यानंतर सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८९२ मि.मी. असून आजपर्यंत ६२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस
जालना शहरासह जिल्ह्याभरात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आले आहे. अंबड तालुक्यात रिमझिम पाऊस झाला.च् परतूर तालुक्यात १५.४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी, नळविहिरा, सावंगी, वरखेडा येथेही मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे मका, सोयाबीन व कापूस या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बीडमधील वडवणी तालुक्यात अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांना पाणी आले आहे. वडवणी तालुक्यातील वडवणी मंडळात ९८ तर कौडगाव मंडळात १०३ मिमी पाऊस झाला. येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर माजलगाव धरणात १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
पावसामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमिवर होणाऱ्या आठवडे बाजारावरही परिणाम झाला. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात सरासरी २९ मिमी पावसाची नोंद झाली. च्बीड तालुक्यात ३०.१ मि.मी.,पाटोदा९.३,आष्टी २.४, गेवराई ३२ मि.मी.,शिरु र ११.७ मि.मी., वडवणी १००.७ मि.मी, अंबाजोगाई १३.६, माजलगाव ४८.२, केज १३.६, धारु र ३९.७ तर परळी तालुक्यात १८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
नांदेडमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला
मुक्रमाबाद (जि. नांदेड): लेंडी नदीवरील पुलावरुन जाताना रावी तालुका मुखेड येथील हनुमंत लक्ष्मण बडगणे हा २५ वर्षीय मोटारसायकलस्वार मोटारसायकलसह वाहून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुक्रमाबाद येथून दोन किमी अंतरावर नांदेड ते बीदर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मुक्रमाबाद येथून दोन किलोमीटर अंतरावर नांदेड ते बीदर हा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी येथे एक छोटासा पुल बनविण्यात आला आहे. पावसामुळे या पुलावरुन दोन फूट पाणी वाहत होते. रावी तालुका मुखेड येथील हनुमंत लक्ष्मण बडगणे हा तरुण मोटारसायकलवरून आपल्या पत्नी व मुलाना घेऊन गंगाखेड जिल्हा परभणी येथील सासुरवाडीकडे जात होता.
पुलाजवळ पत्नी व मुलांना पलीकडे सोडल्यानंतर तो मोटारसायकल ठेवण्यासाठी परत अलिकडे येत होता. तेवढ्यात पाण्याच्या लोंढ्याने तो मोटारसायकलसहित वाहून गेला. माहिती मिळाल्यानंतर मुक्रमाबादचे सपोनि. कमलाकर गडिमे, बीट जमादार शिवाजी आडेकर, माधव जळकोटे, बाळू इंद्राळे यांनी स्थानिकांना सोबत घेऊन त्याचा शोध घेतला असता ५० फूट अंतरावर मोटारसायकल सापडली. मात्र उशिरापर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता.