‘त्या’ व्हेंटिलेटर्सची खासगी रुग्णालयांकडून ‘वापसी सुरू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:17+5:302021-05-21T04:04:17+5:30
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून गाजणारे पीएम केअर फंडातील दुय्यम दर्जाच्या व्हेंटिलेटरची खासगी रुग्णालयांकडून घाटी ...
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून गाजणारे पीएम केअर फंडातील दुय्यम दर्जाच्या व्हेंटिलेटरची खासगी रुग्णालयांकडून घाटी रुग्णालयाकडे वापसी सुरू झाली आहे. एका खासगी रुग्णालयाने दोन नादुरुस्त व्हेंटिलेटर गुरुवारी परत केले असून, उर्वरित तीन व्हेंटिलेटरही शुक्रवारी परत केले जाणार आहेत.
पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटरची अवस्था ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. घाटी रुग्णालयास प्राप्त झालेल्या पीएम केअर फंडातील १५० पैकी ४१ व्हेंटिलेटर हे शहरातील पाच खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर घेऊन २२ दिवस होऊनही या रुग्णालयांत व्हेंटिलेटरचा वापर सुरू झालेला नाही. सदर व्हेंटिलेटर तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी आणि अपग्रेड करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच राजकोटहून कंपनीचे आणखी एक तज्ज्ञ शहरात दाखल झाले आहे. चार जणांचे हे पथक व्हेंटिलेटर दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात व्हेंटिलेटर अपग्रेड केले जात आहे. पण एकाही व्हेंटिलेटरचा वापर घाटीत सुरू झालेला नाही. हे पथक घाटीसह आता खासगी रुग्णालयांना भेटी देत आहे.
शहरातील युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलला २७ एप्रिल रोजी पाच व्हेंटिलेटर देण्यात आले होते. याठिकाणी हे व्हेंटिलेटर स्टॅण्डबायच ठेवले होते. यातील दोन व्हेंटिलेटर रुग्णालयाने गुरुवारी घाटीला परत केले. उर्वरित तीन व्हेंटिलेटर शुक्रवारी परत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. व्हेंटिलेटर परत घेताना घाटी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. व्हेंटिलेटर का परत केली जात आहे, यासंदर्भात लेखी अहवाल घेतला जात आहे; पण खासगी रुग्णालयांनी दिलेले कारण सांगण्यास घाटी व्यवस्थापनाने असमर्थता व्यक्त केली आहे.
आणखी एक रुग्णालय घेणार आज निर्णय
एका रुग्णालयाला १० मे रोजी व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र, इंजिनिअरने आठ दिवसांनंतर १८ मे रोजी व्हेंटिलेटर इन्स्टाॅल केले. या व्हेंटिलेटरची आता माॅनिटरिंग सुरू आहे. शुक्रवारी व्हेंटिलेटरची स्थिती समोर येईल, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
चौकट
सर्वांचेच धोरण बोटचेपेपणाचे
व्हेंटिलेटर परत घेताना त्याचे कारण नमूद करण्याचे घाटी रुग्णालयाने सांगितले आहे. त्यानुसार या रुग्णालयाने सदर ‘व्हेंटिलेटर फंक्शनल’ नसल्याचे कारण नमूद केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यातून नेमके कारण स्पष्ट होत नाही. असे गोलमोल कारण देऊन खासगी रुग्णालये आपली गुंतलेली मान मोकळी करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.