कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेले बँक अधिकारी माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:57 AM2018-01-10T00:57:27+5:302018-01-10T00:57:43+5:30
गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बँक अधिकाºयांना कारखाना सभासद व उस उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या अधिका-यांना या ठिकाणी तीव्र विरोध झाल्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आल्यापावली परतावे लागल्याने गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तूर्तास लांबली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बँक अधिकाºयांना कारखाना सभासद व उस उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या अधिका-यांना या ठिकाणी तीव्र विरोध झाल्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आल्यापावली परतावे लागल्याने गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तूर्तास लांबली आहे.
९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान गंगापूर कारखाना स्थळावर सदर आंदोलन झाले. यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे शेतकºयांच्या ताब्यात दिलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड, त्यांचे सहकारी एम. आर. कदम, एल. एस. यादव, बी.बी. उगले, बी.सी.जेवे, एस.एस.स्वामी, बी.एल.कदम, एस.आर.पांचाळ आदींचा ताफा या ठिकाणी आला होता.
मात्र या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत बंब, व्हा. चेअरमन लक्ष्मण भुसारे, संचालक मंडळ, संतोष जाधव, प्रदीप पाटील, प्रताप साळुंके, मधुकर वालतुरे, रामेश्वर मुंदडा, महेमूद पटेल, हरिभाऊ डव्हाण, मारुती खैरे, कल्याण गायकवाड, हाजी नासीरोद्दीन, अप्पासाहेब पाचपुते, भारत तुपलोंढे, बशीर पटेल आदींसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी अगोदरच कारखाना प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले होते.
यावेळी आ. बंब म्हणाले की, न्यायालयात बरेच खटले प्रलंबित असल्याने त्यांना वेळ लागतो. नेमकी हीच संधी साधून वेळखाऊपणा करायचा आणि कधीतरी कारखाना आपल्याला भेटेल, या अपेक्षेने राजाराम फूड्सने चाल केली होती. मात्र शेतकºयांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. शेतकºयांना वेठीस धरणाºया बँकेलाही एका प्रकारे चपराक बसली आहे. २००८ मध्ये बँकेने चालू सुस्थितीत असलेला कारखाना गैरपद्धतीने ताब्यात घेतला होता. तो कारखाना किमान त्यांनी चालवायला पाहिजे होता. जेणेकरून वर्षाला १० ते १५ कोटींचा फायदा होऊन कारखाना कर्जमुक्त झाला असता. आजमितीला हा कारखाना शेतकºयांचा ताब्यात असला तरीदेखील वेळ हातून गेलेली नाही. साखर कारखाना हा शेतकºयांच्या मालकीचा आहे, यापुढेही राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, मात्र शेतकºयांचा रोष पाहता हा प्रकार थांबला पाहिजे व कारखाना शेतकºयांच्या ताब्यात दिला पाहिजे.
वेळप्रसंगी रक्त सांडू...
गंगापूर कारखाना शेतकºयांच्या मालकीचा राहण्यासाठी वेळप्रसंगी रक्त सांडू व शेतकºयांच्या कारखान्यावर कुणी राजकारण करत असेल तर त्यांनाही त्यांची जागा दाखवू, असे म्हटले. यासाठी लवकरच शेतकºयांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे संतोष जाधव म्हणाले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
अधिकारी या ठिकाणी येताच जमावामधील सदाशीव शिरसाठ-सिरजगाव, अक्षय नरोडे -शिल्लेगाव यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ या लोकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी परिसर पिंजून काढत आंदोलनस्थळावर अगोदरच लपवून ठेवलेले रॉकेलचे भरलेले डबे ताब्यात घेऊन जप्त केल्याने आंदोलकांना हालचाल करता आली नाही. मात्र यावेळी एकच गोंधळ उडाला. रेटारेटी व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. याठिकाणी गोंधळ होणार हे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक एस.एस. बिर्ला यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता . गोंधळ वाढत असल्याचे पाहून कारखान्याचे चेअरमन आ. बंब यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.
बँक अधिकारी म्हणतात... न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही
बँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड यांना कारखाना ताब्यात घेण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९ /अ अन्वये शासनाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून जनहित व न्यायालयाच्या आधीन राहून सदर कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या २२/१२/२०१७ मधील आदेशानुसार याचिका क्रमांक १०९०८ /२०१२ प्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.