विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ओमकार संकपाळ | Published: July 6, 2022 08:41 PM2022-07-06T20:41:13+5:302022-07-06T20:41:32+5:30
तरुणाने शेतातील कोठ्यात घुसून केला होता महिलेचा विनयभंग
सिल्लोड: तालुक्यातील डखला येथे एका २८ वर्षीय तरुणाने ३८ वर्षीय नातेवाईक असलेल्या महिलेची शेतात छेड काढली. यावरून महिलेच्या नातलगांनी तरुणाला घरासमोरच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
ऐशीनाथ नामदेव सपकाळ असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी कृष्णा रंगनाथ सपकाळ, किरण रंगनाथ सपकाळ आणि एक महिला यांच्यावर अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेह पोलिसांनी कृष्णा आणि किरण यांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक अरुण गाडेकर करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
मृत ऐशीनाथ आणि कृष्णा सपकाळ, किरण सपकाळ यांचे शेत शेजारी आहे. रविवारी ऐशीनाथ याने शेजारील शेतात जाऊन एका महिलेचा विनयभंग केला. महिलेने तेथून पळ काढत गावात जाऊन नातेवाईकांना याची माहिती दिली. यामुळे संतापलेल्या कृष्णा आणि किरण यांनी ऐशीनाथ यास त्याच्या घरासमोरच बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी ऐशीनाथवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.