औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावर आज महसूल प्रशासनाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:24 AM2018-03-15T11:24:59+5:302018-03-15T11:29:56+5:30
कचरा प्रश्नावर आज पुन्हा विभागीय आयुक्तांच्या दालनात बैठक होणार आहे. शहराच्या कचरा समस्येप्रकरणी महसूल प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.
औरंगाबाद : कचरा प्रश्नावर आज पुन्हा विभागीय आयुक्तांच्या दालनात बैठक होणार आहे. शहराच्या कचरा समस्येप्रकरणी महसूल प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.
मार्चअखेर असल्यामुळे वसुली, डीपीडीसीचे नियोजन, समृद्धी व एनएच २११ चे भूसंपादन व इतर कामांचा प्रचंड ताण यंत्रणेवर आहे. शिवाय नगरविकास खात्याने शहरातील कचरा समस्येसाठी नेमून दिलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणेला सगळी कामे बाजूला ठेवून ‘कचरा एके कचरा’ हेच काम करण्याची वेळ आली आहे.
२६ दिवसांपासून कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पन्नासहून अधिक बैठका झाल्या आहेत. शेवटी कचरा टाकण्यासाठी कुठेही जागा न मिळाल्यामुळे झोननिहाय प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले आहे; परंतु शहरात २२ दिवस पडलेला कचरा उचलून टाकण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठी महसूल, मनपाची यंत्रणा रोज बैठका घेऊन खल करीत आहे.
पंचसूत्रीवर चर्चा शक्य
शुक्रवारी ९ मार्च रोजी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेऊन कचच्या समस्येवर मात करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला होता. त्या पंचसूत्री कार्यक्रमात स्थानिक प्रशासन किती यशस्वी ठरले याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणे शक्य आहे. विशेष म्हणजे नगर परिषद हद्दीमध्ये ‘चिरंतन विकास’ या थीमवर काम करणारे मुख्याधिकारी शहरात काम करीत आहेत. जिल्हाधिकारी एन.के. राम हे आज झोननिहाय पाहणी करणार आहेत.