‘महसूल’, ‘आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: July 14, 2014 11:55 PM2014-07-14T23:55:19+5:302014-07-15T00:54:25+5:30
उस्मानाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.
उस्मानाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनामुळे दोन्ही विभागांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते.
महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्यात, यासाठी संघटनेच्या वतीने १ जुलै रोजी काळ्या फिती लाऊन कामकाज करून जवणाच्या सुटीत जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती. तसेच यानंतर ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु, मागण्यांबाबत शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने सोमवारी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिवसभर महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनात कार्याध्यक्ष सी. व्ही. शिंदे, सहसचिव डी. एम. मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद महसूल वाहन चालक संघटना तसेच चतुर्थश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. दरम्यान, हेच प्रश्न घेऊन १ आॅगस्टपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याचे संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, भूम येथेही संघटनेच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात ए. एम. जाधवर, एस. सी. गलांडे, एस. जी. कवडे, टी. एस. गलांडे, एस. डी. वाघमारे, एस. डी. कुलकर्णी, एस. के. जाधव, बी. व्ही. साळुंके, ए. एम. पवार, मोहन अढागळे आदी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनेही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. डॉ. आनंदे समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात, हिवताप विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदलीचे अधिकार सहाय्यक संचालकांना द्यावेत, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतनानुसार दहा हजार रूपये मिळावेत तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी हे आनदोलन करण्यात आले. याच मागण्या घेऊन १६ जुलैपासून मुंबई येथे मोर्चा व सत्यागृह आंदोलनही सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात राज्य अध्यक्ष अरूण खरमाटे, कार्यकारी अध्यक्ष प्रमिला कुंभारे, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, महासचिव ए. एस. सपकाळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शरद मुंडे, संघटक मदन जाधव, कोषाध्यक्ष एल. डी. सतार, तानाजी क्षीरसागर, ए. एच. पठाण, सुनील मिसाळ, सुनील डावकरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)