महसूल विभाग हादरला; विभागीय आयुक्तालय कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:16 PM2020-08-22T20:16:06+5:302020-08-22T20:18:46+5:30
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीदेखील अँटिजन टेस्ट करण्यात आली, तर आयुक्तालयाच्या व्हरांड्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यासाठी सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांनी मनपाचे पथक बोलाविले होते.
औरंगाबाद : विभागातील कोरोनावर उपाययोजनांची पाहणी आणि संचिकांची हाताळणी करताना शेवटी विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोना पोहोचला. चार महिन्यांपासून सुरक्षा साधनांचा वापर करून सामान्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील कोरोनाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविली. महसूल उपायुक्त पराग सोमण यांच्यासह एका नायब तहसीलदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, आयुक्तालयातील सुमारे १८० जणांची तातडीने अँटिजन टेस्ट करण्यात आली.
उपायुक्त सोमण यांच्या संपर्कात आलेल्या ७६ जणांची हायरिस्क म्हणून आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीदेखील अँटिजन टेस्ट करण्यात आली, तर आयुक्तालयाच्या व्हरांड्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यासाठी सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांनी मनपाचे पथक बोलाविले होते. तसेच आयुक्तालयाच्या सर्व परिसरात औषधी फवारणी करण्यात आली. सकाळपासून आयुक्तालयात सामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शनिवारी आणि रविवार सुटी असल्यामुळे आयुक्तालय बंद राहणार आहे. सोमवारपर्यंत आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यांचा हायरिस्क कॉन्टॅक्ट
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्यासह उपायुक्त सोमण, उपायुक्त वर्षा ठाकूर, डॉ. विजयकुमार फड यांच्यासह अनेक अधिकारी दररोज कोणत्या ना कोणत्या बैठकीसाठी आयुक्तालयात हजर राहतात. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांसह महसूल शाखेतील कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच धास्तावले. दरम्यान, सोमण हे पुण्याला जाऊन आल्यामुळे त्यांना तिकडूनच लागण झाल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.