मराठवाड्यात ‘महसूल’च्या बदल्या ! उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ तहसीलदारांची यादी जाहीर
By विकास राऊत | Published: April 13, 2023 04:29 PM2023-04-13T16:29:58+5:302023-04-13T16:30:17+5:30
मागील आठ महिन्यांपासून बदल्यांच्या प्रस्तावावर निर्णय होत नव्हता.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सुमारे डझनभर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या. तर आज १४ तहसीलदारांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय विभाग बदलण्यात आला आहे.
मागील आठ महिन्यांपासून बदल्यांच्या प्रस्तावावर निर्णय होत नव्हता. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. तर ३१ मे पर्यंत महसूलमधील पूर्ण बदल्या होतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पदस्थापना देण्यात आली आहे, तर वक्फ जमिनीच्या प्रकरणात निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांस पदस्थापना देत विदर्भात बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोकण विभागातील ५० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. मराठवाड्यातील बदली झालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. यामध्ये वैजापूर, कन्नड उपविभागीय अधिकारी, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकाऱ्यांसह हिंगोली, लातूर, बीड, जालना, नांदेड येथील पदांवर अजून कुणालाही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखी काही बदल्यांची ऑर्डर होईल, अशी चर्चा आहे.
मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये चंद्रकांत सूर्यवंशी यांची रत्नागिरीत, जीवन देसाई रायगड, मच्छिंद्र सुकटे सिंधुदुर्ग, अंजली पवार कोकण भवन, नामदेव टीळेकर माळशिरस, शर्मिला भोसले नाशिक, माणिक आहेर शिर्डी, सुधीर पाटील अहमदनगर, जनार्दन विधाते छत्रपती संभाजीनगर, संगीता चव्हाण नांदेड, शेषराव सावरगावकर महसूल प्रबाेधिनीत बदली झाली आहे.
फौजदारीच्या अधीन राहून पदस्थापना
बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना प्रकाश आघाव पाटील यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला असून, विभागीय चौकशी सुरू आहे. चौकशीच्या व फौजदारी प्रकरणाच्या अधीन राहून त्यांना गोंदिया जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील १४ तहसीलदारांच्या बदल्या
विभागातील १४ तहसीलदारांच्या बदल्या शासनाने केल्या असून दोन जणांना प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्यामध्ये महेश परांडेकर यांची लातूरहून धर्माबादला, दत्तात्रय शिंदे यांची लातूरला, विद्याचरण कवडकर यांची कन्नड येथे, संजय वारकड यांची नांदेडला, अश्विनी डमरे यांची विभागीय आयुक्त कार्यालयात, सुवर्णा पवार यांची आयुक्तालयात, नरेंद्र कुलकर्णी यांची बीड येथे, श्रीकांत भुजबळ यांची महसूल प्रबोधिनीत, काशिनाथ पाटील यांची देवणी तालुक्यात, शिवानंद बिडवे यांची धाराशिव येथे, तेजस्विनी जाधव यांची परभणीत बदली झाली तर प्रणाली तायडे यांची राज्य हक्क सेवा आयोगात आणि योगिता कोल्हे यांची रस्ते विकास महामंडळमध्ये तसेच स्वप्नील पवार यांची लातूर येथून कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.