‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:26 PM2018-04-06T18:26:15+5:302018-04-06T18:27:45+5:30
महसूल प्रशासनाच्या कृपेने शहरात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत.
औरंगाबाद : शहरात अनेक ठिकाणी वाळूचे मोठ-मोठे ढीग आहेत. महसूल प्रशासनाच्या कृपेने शहरात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत. वाळू उपसा करण्याचे ठेके दिलेले नसताना शहरात वाळू कुठून येत आहे. असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
एन-११ येथील वाळूच्या ढिगाऱ्याखाली बुधवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला. रात्रीतून वाळूचा ट्रक तेथे टाकण्यात आला असावा आणि त्याखाली तो तरुण श्वास गुदमरून मृत झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या परिसरात सुमारे सात ते आठ वाळूचे मोठमोठे ढीग साचले असून, ती वाळू कोठून आली, कुणाच्या कृपेने आली, याचे उत्तर महसूल प्रशासन, पोलीस देणार की नाही, असा प्रश्न आहे.
सात महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळूपट्टे तस्करांच्या विळख्यात आले आहेत. परिणामी गौण खनिजातून मिळणारा बहुतांश महसूल यावर्षी बुडाला आहे. सात महिन्यांत वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने अधिकृतरीत्या ठेका दिलेला नसताना शहरात वाळू कोणत्या पट्ट्यातून येते, याचा शोध घेण्यासाठी प्रशासन धजावत नाही. आॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी औरंगाबाद जिह्यात ३१ वाळूपट्टे लिलाव प्रक्रियेत असून, प्रशासनाला ६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता.
३१ पैकी ७ वाळूपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया पुढे सरकली; मात्र सातपैकी एकही वाळूपट्टा ठेकेदाराला दिलेला नाही. वाळूपट्टा लिलावाला देण्यापूर्वी एका पट्ट्यातून किती ब्रास वाळू उपसा होऊ शकतो, याची अंदाजे माहिती प्रशासनाने ठेकेदारांना दिलेली असते. सध्या एकही वाळूपट्टा ठेकेदाराच्या ताब्यात नाही. मग वाळू शहरात येते कोठून? याचा शोध प्रशासनाला का घेता आला नाही. देवळा, जवखेडा खुर्द येथील दोन पट्टे दिले आहेत.
यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे येते वाळू
अंबड परिसरातील एका पोलीस ठाणे निरीक्षकात आणि पोलीस हवालदारामध्ये वाळूचे ट्रक पकडल्यावरून संभाषण झाल्याची एक ध्वनिफीत गेल्या महिन्यात सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली. पोलीस यंत्रणाच वाळू चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात संबंधितांना मदत करीत असल्याचे महसूल प्रशासनाने वारंवार बैठकीमध्ये सांगितले आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.