महसूलचा वाळूमाफियांना दणका; दंड न भरणाऱ्या मुजोरांच्या सातबाऱ्यावर सहा कोटींचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 12:33 PM2022-01-22T12:33:42+5:302022-01-22T12:36:17+5:30
वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार
गंगापूर ( औरंगाबाद ) : गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दणका दिला आहे. वाळूज मंडळातील वाळूमाफियांना सहा कोटींचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्यात आला आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून, वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर शेंदूरवादा व लासूर परिसरातील अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना प्रशासन कशा प्रकारे पायबंद घालणार हा पण एक प्रश्न आहे.
गौणखनिज माफियांवर अनेकदा कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु, ते प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत असल्याची स्थिती आहे. अशाच मुजोर व प्रशासनाला कोणतीही दाद न देणाऱ्या वाळूज मंडळातील कासोडा, तळेसमान, आसेगाव, नांदेडा व मुस्तफाबाद शिवारातून सत्तावीस वाळू चोरांनी एकूण २ हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा केला आहे. अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड आकारण्यात येतो. त्याआधारे तहसीलदार सोनी यांनी या वाळू चोरांना जोरदार दणका दिला असून सत्तावीस जणांच्या सातबाऱ्यावर एकूण ६ कोटी ९ लाख ७४ हजार ४४८ रुपयांचा बोजा चढवला आहे. लाखोंचा दंड आकारल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे शेंदूरवादा व लासूर परिसरात रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतुकीलासुद्धा तहसीलदारांनी वेसण घालावी, अशी मागणी होत आहे.
यांना ठोठावला दंड
पोपट काळे, जालिंदर कर्डीले, सय्यद इनाम, रावसाहेब माने, रंगनाथ शेळके, मीना शेळके, विश्वनाथ देवबोने, भाऊसाहेब चाने (कासोडा), देविदास शेळके, नारायण कांबळे, शेख जफर बाबा, शेख सुलतान बाबा, शेख इब्राहीम बाबा, हसीना शेख सय्यद गणी, नंदू जाधव, कारभारी जाधव, लक्ष्मण जाधव, प्रभाकर जाधव, प्रभाकर कुलकर्णी (तळेसमान), सय्यद गणी, शेख जहूर ममेमुद कासम, बाळू जाधव, बाळू बल्लाळ (आसेगाव), अर्जून मते, ज्ञानेश्वर भांगरे, (नांदेडा), मुरलीधर थोरात (मुस्तफाबाद) यांचा समावेश आहे.
मालमत्तेचा लिलाव करू
वाळूमाफियांना दंड वसुलीसाठी तातडीने रीतसर नोटीस पाठवणार आहे. संबंधितांनी दंड भरला नाही तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल.
- सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर