महसूल-पोलीस दलात संघर्ष!
By Admin | Published: January 28, 2017 11:57 PM2017-01-28T23:57:07+5:302017-01-28T23:57:44+5:30
अंबड : तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे
अंबड : तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. वाळू वाहतुक करणारा ट्रक तहसील कार्यालयातून वाळू माफियाने पळवून नेल्यामुळे सुरु झालेला संघर्ष एक आठवड्यानंतरही सुरुच आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांंना २६ जानेवारी रोजी अंबड तहसिल कार्यालयाच्या कोतवालांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले व या संघर्षनाट्याचा पाहिला अंक संपला. दुसरीकडे निलंबित पोलीस उपनिरीक्षकांनी निलंबन प्रकरणी आपण दाद मागणार असल्याचे सांगत संघर्षनाट्याचा दुसरा अंक लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत दिले.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी पहाटे अंबड तहसील कार्यालयातून आणखी एक वाळू तस्करी करणारा ट्रक पळवून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महसूल कर्मचाऱ्यांची संघटना असल्याने त्यांनी दबाव आणून जाधव यांना निलंबित करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले. मात्र आमची संघटना नसल्याने आम्हाला इच्छा असूनही निलंबित पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांना पाठिंबा देता येत नसल्याचा संताप व हतबलता अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याचा अटीवर व्यक्तकेली.
२१ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अंबड तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू तस्करी करणारा हायवा ट्रक शहरातील एसबीआय बँकेसमोर पकडला. दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सहा वाळुतस्करांनी रात्रीपाळीच्या ड्युटीवर असलेल्या सोमनाथ सरफळे व विश्वंभर केदार या कोतवालांना शिवीगाळ करुन हायवा ट्रक तहसिल कार्यालयातून पळवून नेला. ११.३० वाजेच्या सुमारास कोतवाल सरफळे व केदार यांनी अंबड पोलीस ठाण्यात याची रितसर फिर्याद दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादीची कॉपी आणण्यासाठी गेलो असताना पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी फिर्यादीत बदल करण्याचा दबाव आणून आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा कोतवाल सरफळे यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे तहसील कार्यालयात वाळू तस्करीसाठी जप्त असलेला व नंतर वाळू तस्करांनी चोरुन नेलेल्या हायवा ट्रकचा पंचनामा, गाडी क्रमांक व इतर कागदपत्रांची तपासकामांसाठी मागणी केली असता कोतवालाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बाचाबाची झाल्याचा निलंबीत उपनिरीक्षक जाधव यांचा दावा आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान वाळू तस्कर हरीभाऊ तौर यानेही आपल्या जप्त केलेल्या हायवा ट्रकच्या पंचनामा व इतर कोणतीही नोंद नसल्याने कोतवालांना पैसे देऊन हायवा ट्रकनेल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला. तौर याने केलेल्या दाव्याचा तहसिलदार डी.एन.भारस्कर यांनी जोरदार खंडण केले.
विशेष म्हणजे २६ जानेवारीच्या पहाटे तहसिलमध्ये जप्त करुन लावलेला आणखी एक हायवा चोरीला गेला. दरम्यान दुसऱ्या वेळी चोरीला गेलेल्या हायवा ट्रकच्या पंचनाम्याची कॉपी व इतर कागदपत्रे महसूल विभागाने पोलिसांना सादर केले. दुसऱ्या वेळी चोरीला गेलेल्या ट्रकचा पंचनामा सादर करता आला मग पहिल्या वेळी तहसिलमधून चोरीला गेलेल्या ट्रकच्या पंचनाम्याची कॉपी व इतर कागदपत्रे महसूल विभागाने त्यावेळी सादर का केली नाहीत, असा सवाल पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.