शांतीगिरी महाराजांसोबत महसूलमंत्र्यांचे स्नेहभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:45 AM2017-12-02T00:45:38+5:302017-12-02T00:46:19+5:30
२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणणारे शांतीगिरी महाराज यांच्यासोबत महसूल, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तब्बल दीड तास घालविला.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणणारे शांतीगिरी महाराज यांच्यासोबत महसूल, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तब्बल दीड तास घालविला. पूजापाठ, अभिषेकानंतर या उभयतांनी सोबत स्नेहभोजनही केले. धार्मिक व्यासपीठावरील या राजकीय स्नेहभोजनाचा सुगंध आगामी निवडणुकांमध्ये कसा दरवळणार, याची उत्सुकता आता लागलेली आहे. कन्नडच्या शिवसेना आमदाराला ५ कोटींची आॅफर पक्षांतरासाठी दिल्यानंतर उठलेल्या वादळाची धूळ खाली बसेपर्यंत पाटील औरंगाबादला येऊन जातात यामागे काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शांतीगिरी महाराज सध्या जरी राजकारणातून अलिप्त असले तरी त्यांचा ‘भक्त परिवार’ खूप मोठा आहे. जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत त्यांचे नेटवर्क आहे. १५ मिनिटांचा वेळ वेरूळ येथील जनार्दनस्वामी आश्रम भेटीसाठी ठेवण्यात आला होता; परंतु १५ मिनिटांचे केव्हा दीड तास झाले हे कळलेही नाही. बांधकाम मंत्री आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील चर्चा गुप्त ठेवण्यात आली असली तरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्याचाच हा भाग असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे
सतीश चव्हाण यांचीही घेतली भेट
चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाटील यांनी चव्हाण यांची घरी जाऊन भेट घेण्यामागे काय राजकारण आहे, असा तर्क लावला जात आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील रस्ते, शेतकरी कर्जमाफी आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे आमदार चव्हाण यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
नवउद्योजकांशी केली चर्चा
अॅड. श्रीकांत अदवंत यांच्या निवासस्थानी नवउद्योजकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर वास्तुविशारद सुशील देशमुख यांच्या निवासस्थानी मसिआ, उद्योजक, व्यावसायिकांसोबत त्यांनी बैठक घेतली, तसेच किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी त्यांनी हजेरी लावली. शिवाय हर्सूल येथील सतीश वेताळ यांच्याकडेही पाटील यांनी बैठक घेतली. सरकारकडून सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी या नागरिकांशी चर्चा केली. मराठा समाजाच्या विविध संघटना पदाधिका-यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, असे पाटील यांच्या कोअर ग्रुपमधून सांगण्यात आले.