बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:29 PM2019-05-29T18:29:08+5:302019-05-29T18:30:27+5:30
बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे.
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढच्या महिन्यात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर १७ मेपासून सुरू असलेले महसूल कर्मचारी संघटनांचे आंदोलन महिनाभरासाठी थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. बदल्यांसाठी इच्छुकांनी वशिले लावण्यास सुरुवात केली आहे. संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून इच्छुकांच्या बदल्यांचे काम हाती घेतले आहे. त्या कामात काम बंद आंदोलनामुळे खोडा येऊ नये म्हणून महिनाभरासाठी आंदोलन स्थगित केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बदल्यांची यादी करण्यात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी सक्रिय असून, त्यांनीच आंदोलनाची दिशा बदलल्याचे कळते.
बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे. आंदोलन सुरूच राहिले असते तर बदल्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उलथा-पालथी केल्या असत्या. त्यामुळे इच्छुकांच्या बदल्या मर्जीच्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे झाल्या असत्या. शिवाय या प्रकरणात ज्यांनी सगळी ‘जमवा-जमव’ केली आहे, त्यांच्या हाती काहीच लागले नसते. परिणामी, मध्यम मार्ग काढीत आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यातच सगळ्यांचे एकमत झाले.
गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महसूल प्रशासनातील अंतर्गत बदल्या करून अनेकांची मुख्यालयात बसलेली घडी विस्कटून टाकली. त्या प्रकरणात विभागीय आयुक्तांपर्यंत चौकशीच्या मागणीसाठी संघटनांनी आवाज वाढविला; परंतु त्यातून काही फलित झाले नाही. ३६ कर्मचाऱ्यांचे मुख्यालय बदलण्यात आले आहे. ६५ पैकी ३८ मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्याही गेल्या वर्षी १ जून रोजी करण्यात आल्या होत्या. महिनाभर बदल्यांवरून प्रशासनात खदखद सुरू होती. काहींनी तर मंत्रालयात जाऊन बदली रद्द करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
उगाच वाद नको म्हणून
यावर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या करताना गेल्या वर्षीसारखाच निर्णय घेतला, तर ज्यांनी इच्छित ठिकाणी बदली करण्यासाठी देऊन-घेऊन वशिला लावला आहे. त्यांचे कामबंद आंदोलनामुळे नुकसान झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्यांच्या पार्श्वभूमीची बाब हेरली आणि संघटना पदाधिकाऱ्यांशी २७ मे रोजी चर्चा करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. बदल्यांच्या तोंडावर उगाच जिल्हाधिकाऱ्यांशी वाद नको म्हणून संघटनांनी सायंकाळी आंदोलन महिनाभरासाठी मागे घेतल्याचे जाहीर केले.