ज्येष्ठ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची प्रकृती, आजारांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:02 AM2021-01-08T04:02:06+5:302021-01-08T04:02:06+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र, लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम ...
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र, लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम होईल का, ही भीती सध्या ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना सतावत आहे. या चिंतेचा विचार करून ज्येष्ठ डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या प्रकृती, आजारांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच त्यांना लस देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
लसीकरणाची जोरदार तयारी सुरू असताना सध्या ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. यातील अनेकांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत. त्यातून काही दुष्परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्यास प्राधान्य देऊ, असे मत ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी वरिष्ठांकडे व्यक्त करीत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने ४ जानेवारी रोजी ‘ज्येष्ठ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत भीती’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेत कर्मचाऱ्यातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार अशा डॉक्टर, कर्मचाऱ्यासंदर्भात योग्य ती काळजी घेऊनच लसीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
अशी घेणार खबरदारी
एखादी महिला आरोग्य कर्मचारी जर गरोदर असेल तर तिला कोणत्या महिन्यात लस द्यावी, एखादा आरोग्य कर्मचारी कर्करोग, मधुमेह, टीबी, उच्चरक्तदाब आदींवर उपचार घेत असेल तर त्यास लस द्यावी की नाही, लस देताना कोणती काळजी घ्यावी लागेल आदीसंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना (एसओपी) प्राप्त होणार आहे.
नोंदणी केली, लसही घेणार
लसीकरणासाठी मी नोंदणी केलेली आहे आणि नियोजनानुसार लस घेणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनीही कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
६० वर्षांपासून लसीकरण
लसीकरण गेल्या ६० वर्षांपासून सुरू आहे. अनेक आजारांवर लसीकरण झाले. त्यामुळे आपल्याकडे लसीकरणाचा चांगला अनुभव आहे. आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आजारांचा विचारही केला जाणार आहे. मी लस घेणार आहेच, पण त्याआधी प्रत्येकाला लस मिळेल, यास माझा प्राधान्यक्रम आहे.
-डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक