सुधारित - प्रख्यात उद्योगपती आर. एल. गुप्ता यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:05 AM2021-05-19T04:05:06+5:302021-05-19T04:05:06+5:30
औरंगाबाद : स्टील उद्योग जगतातील प्रख्यात उद्योगपती आर. एल. गुप्ता (८९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. एन-६ ...
औरंगाबाद : स्टील उद्योग जगतातील प्रख्यात उद्योगपती आर. एल. गुप्ता (८९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. एन-६ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्योग, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्याेगपती नरेंद्र गुप्ता यांचे वडील, तर नितीन गुप्ता यांचे ते आजोबा होत.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आग्रहाखातर मूळचे मथुरा येथील उद्योगपती गुप्ता १९७९ मध्ये औरंगाबादेत आले. त्यानंतर एलोरा स्टील उद्योगाचे ५० टक्के समभाग विकत घेतले आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीला नवसंजीवनी दिली. त्यानंतर चिकलठाणा येथे १९८१ साली आरएल स्टील उद्योगाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. या उद्योगाने स्टील उद्योगाची कक्षा रुंदावली. त्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये अजंता ऑटो इण्डस्ट्री अधिग्रहीत केली. याला त्यांनी या कंपनीला आकार टुल्स कंपनी असे नाव दिले. याचा वाळूज महानगरात विस्तार करण्यात आला. चितेगाव येथे आरएल स्टील उद्योगाचा विस्तार करण्यात आला. सध्या कोरोना संकट काळात या उद्योगातून ऑक्सिजन उत्पादनाचे मोठे केंद्र बनले आहे. त्यांचा अनेक सामाजिक, धार्मिक कार्यात सहभाग असायचा. त्यांनी उत्तर भारत संघाची स्थापना करुन रामलीला आणि रावण दहन या कार्यक्रमांची सुरुवात केली.
फोटो आहे