एसटीचालक होण्याच्या ‘ती’च्या स्वप्नांना पुन्हा बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:03 AM2021-03-16T04:03:56+5:302021-03-16T04:03:56+5:30

औरंगाबाद : एसटी महामंडळाने कोरोनाच्या नावाखाली महिलांच्या हाती दिले जाणारे ‘एसटी’चे स्टिअरिंगच ‘जाम’ केले होते. औरंगाबादेत सुरू असलेल्या ३२ ...

Revive her dreams of becoming an ST driver | एसटीचालक होण्याच्या ‘ती’च्या स्वप्नांना पुन्हा बळ

एसटीचालक होण्याच्या ‘ती’च्या स्वप्नांना पुन्हा बळ

googlenewsNext

औरंगाबाद : एसटी महामंडळाने कोरोनाच्या नावाखाली महिलांच्या हाती दिले जाणारे ‘एसटी’चे स्टिअरिंगच ‘जाम’ केले होते. औरंगाबादेत सुरू असलेल्या ३२ महिलांचे प्रशिक्षण आठ महिन्यांपासून ठप्प होते. परंतु अखेर हे प्रशिक्षण आता पुन्हा एकदा सुरू झाले असून, लवकरच ‘ती’च्या हाती ‘एसटी’चे सारथ्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

औरंगाबाद आणि नाशिक प्रदेशासाठी चालकपदासाठी ३२ महिलांची निवड करण्यात आली. यात औरंगाबाद विभागतील सहा महिलांचा समावेश आहे. ३ फेब्रुवारी २०२०पासून त्यांचे औरंगाबादेत प्रशिक्षणही सुरू करण्यात आले होते. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर या सर्व महिला एसटीचालक म्हणून रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. पण एसटी महामंडळाने १७ जुलै २०२० रोजी एका पत्राद्वारे सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग व अधिकारी पदांमध्ये आणि अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना केली. त्यानुसार औरंगाबादेत प्रशिक्षण थंबविण्यात आले. याविषयी ‘लोकमत’ने २१ जुलै २०२० ‘महिलांच्या हाती दिले जाणारे एसटीचे स्टिअरिंग केले जाम’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले.

प्रशिक्षण पुन्हा कधी सुरू होईल, याची कोणतीही माहिती दिली जात नव्हती. काही कालावधीनंतर झालेली निवडच रद्द होण्याची आणि त्यातून एसटीत चालक म्हणून रुजू होण्याच्या स्वप्नानांवर पाणी फेरले जाण्याची भीती निवड झालेल्या महिला उमेदवारांकडून व्यक्त होत होती. याविषयी ‘लोकमत’ने पाठपुरावा करीत १५ फेब्रुवारी २०२१ रोजीही वृत्त प्रकाशित केले. अखेर जागे झालेल्या एसटी महामंडळाने महिलांचे प्रशिक्षण पुन्हा एकदा सुरू केले आहे.

एसटी अधिकारी म्हणाले, महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू झाल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. वर्ग प्रशिक्षणात ‘एसटी’विषयी माहिती, वाहतूक नियम आणि एसटी चालविण्यासंदर्भात आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी बाळकृष्ण चंदनशिवे यांनी सांगितले.

फोटो ओळ..

१ ) चालकपदाचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला.

२) ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले वृत्त.

Web Title: Revive her dreams of becoming an ST driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.