क्रांतिकारी पाऊल : औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथीयांना मिळणार ‘स्मार्ट’ नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:17 PM2021-02-13T13:17:06+5:302021-02-13T13:17:33+5:30

Third gender persons will get 'smart' jobs in Aurangabad Municipal Corporation औरंगाबाद शहरात तृतीयपंथीयांची संख्या पाचशेपेक्षा अधिक असून, यांतील अनेकजण सुशिक्षित असूनही रस्त्यांवर फिरून पैसे मागून उपजीविका करतात.

Revolutionary step: Third gender persons will get 'smart' jobs in Aurangabad Municipal Corporation | क्रांतिकारी पाऊल : औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथीयांना मिळणार ‘स्मार्ट’ नोकरी

क्रांतिकारी पाऊल : औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथीयांना मिळणार ‘स्मार्ट’ नोकरी

googlenewsNext

औरंगाबाद : तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबादस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. शहर बससेवा, स्मार्ट सिटीच्या कार्यालयात पहिल्या टप्प्यात या नियुक्त्या दिल्या जातील, असे पांडेय यांनी नमूद केले.

तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासन, सेवाभावी, सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण केले जात आहे. काही तृतीयपंथीयांनी विपरीत परिस्थितीवर मात करून समाजात मानाचे स्थान मिळविले आहे. अनेकांनी राजकारणासह इतर कामांत ठसा उमटविला आहे. बोटांवर मोजण्याएवढी उदाहरणे सोडली तर इतरांची मात्र अवहेलनाच सुरू आहे. औरंगाबाद शहरात तृतीयपंथीयांची संख्या पाचशेपेक्षा अधिक असून, यांतील अनेकजण सुशिक्षित असूनही रस्त्यांवर फिरून पैसे मागून उपजीविका करतात. त्यांच्यासाठी पांडेय यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

या संदर्भात पांडेय यांनी सांगितले की, तृतीयपंथीय हा घटक नेहमीच उपेक्षित राहिला आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानाचे स्थान देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत काही तृतीयपंथीयांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा संकल्प केला आहे. लवकरच त्याला मूर्त स्वरूप मिळेल. स्मार्ट सिटी अभियानातर्फे स्मार्ट बससेवा चालविली जाते. या ठिकाणी बसची माहिती देण्यासाठी उद्घोषक किंवा अन्य कामे त्यांना दिली जातील.

दोन महिन्यांत होणार प्रक्रिया पूर्ण
तृतीयपंथीयांना नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातील प्रक्रिया आगामी दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे पांडेय यांनी सांगितले. तृतीयपंथीयांनी पुष्कल शिवम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 

Web Title: Revolutionary step: Third gender persons will get 'smart' jobs in Aurangabad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.