एन-१ मधील बंगला फोडून चोरट्यांनी पळविले रिव्हॉल्व्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 03:57 PM2019-04-06T15:57:41+5:302019-04-06T16:02:34+5:30

९ महिन्यांपासून बंगला बंद होता 

The Revolver was stolen the thieves by breaking the bungalow in N-1 Aurangabad | एन-१ मधील बंगला फोडून चोरट्यांनी पळविले रिव्हॉल्व्हर

एन-१ मधील बंगला फोडून चोरट्यांनी पळविले रिव्हॉल्व्हर

googlenewsNext
ठळक मुद्दे  संधी साधून चोरट्यांनी फोडला बंगलाचांदीची भांडीही लंपास

औरंगाबाद : सिडको एन-१ या उच्चभ्रू वसाहतीमधील बंद बंगल्याची चोरट्यांनी खिडकी तोडून आत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले रिव्हॉल्व्हर, सोन्याची अंगठी, चांदीची भांडी आणि अन्य किमती ऐवज चोरून नेला. ही घटना समोर येताच गुन्हे शाखेसह एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. 

सिडको एन-१ टाऊन सेंटरमधील रहिवासी ज्येष्ठ नागरिक आर.टी. देशमुख यांचा मुलगा ठाणे येथे सरकारी वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. त्यामुळे बंगल्याला कुलूप लावून देशमुख सहकुटुंब ९ महिन्यांपासून ठाणे येथे राहत आहेत. बंगल्याशेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक गजेंद्र दिलीपराव देशमुख हे अधूनमधून बंगल्याची पाहणी करतात. देशमुख हे जिल्हा परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. २ एप्रिल रोजी त्यांनी बंगला उघडला होता आणि काही काळ तेथे थांबून ते बंगल्याला कुलूप लावून घरी गेले होते. दरम्यान, संधी साधून मागील बाजूची खिडकी लोखंडी रॉडने तोडून चोरटे आत घुसले.

बंगल्याच्या तळमजल्यावरील स्टोअर रूम, बेड रूममधील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी तेथील किमती वस्तू उचलल्या. त्यानंतर बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील वेगवेगळ्या तीन खोल्यांतील बेड रूम, कपाटाचे लॉकर तोडून त्यातील चांदीचे दोन ताट आणि वाट्या, चांदीच्या सहा समया, चांदीचे दोन कलश, चांदीचे एक फुलपात्र, चांदीचे चार दिवे, चांदीचे सहा चमचे, सहा पातेले, तसेच १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, परवाना असलेले सुमारे १५ हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर, असा सुमारे सव्वालाखाचा ऐवज चोरून नेला. बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर चोरीला गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे सपोनि. अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

चोरट्यांनी फोडला डीव्हीआर
ठाणे येथे राहत असलेल्या देशमुख यांनी बंगल्याच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोरी करण्यासाठी त्यांच्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांना आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे दिसले. त्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून बंगल्याच्या आवारात फेकून त्याची तोडफोड केली. हा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे. डीव्हीआर पूर्ववत सुरू करण्यात पोलिसांना यश आल्यास चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना सोपे होणार आहे.

तीन दिवसांनंतर श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण
२ एप्रिल रोजी बंगल्यात चोरी झाल्याची माहिती गजेंद्र देशमुख यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली होती. मात्र, तक्रार नोंदवायची अथवा नाही, या द्विधा मन:स्थितीत ते होते. नंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा केल्यानंतर ४ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी ५ एप्रिल रोजी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी बोलावून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

रिव्हॉल्व्हर नेले, काडतुसे ठेवली
चोरट्यांनी देशमुख यांच्या बंगल्यातून रिव्हॉल्व्हर चोरून नेले. मात्र, रिव्हॉल्व्हरशेजारी ठेवलेल्या २० जिवंत काडतुसांना त्यांनी हात लावला नाही. ही काडतुसे चोरट्यांनी का चोरून नेली नाहीत, असा प्रश्न पोलिसांना पडला, तसेच चांदीची काही नाणी बंगल्यात होती. ही नाणीही चोरट्यांनी चोरून नेली नाही. मात्र, तेथील टाटा स्कायचा सेट आॅफ बॉक्स चोरून नेला.

Web Title: The Revolver was stolen the thieves by breaking the bungalow in N-1 Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.