उत्तम तपासासाठी २५ लाख रुपयांची बक्षिसे दिली, गुन्ह्यांचा उलगडा करण्यात शहर पोलीस सहा वर्षात सर्वोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 03:41 PM2022-01-08T15:41:33+5:302022-01-08T15:43:51+5:30
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता : ८४ टक्के गुन्ह्यांचा तपास; प्रसंगी बंद दाराआड कानपिचक्याही
औरंगाबाद : शहर पोलिसांनी नुकत्याच संपलेल्या २०२१ या वर्षामध्ये गुन्ह्यांचा उलगडा करण्यात मागील सहा वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये दाखल ४ हजार ५८५ गुन्ह्यांपैकी ३ हजार ५१४ गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची टक्केवारी तब्बल ८५ टक्के एवढी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर पोलीस आयुक्तालयात २०२१ मध्ये पोलिसांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त डाॅ. गुप्ता यांच्यासह उपायुक्त अपर्णा गिते, उज्ज्वला वनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, शहर पोलिसांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली आहे. काही बाबींमध्ये कमतरताही राहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. गुन्हे शाखा, सायबर शाखा यांनी गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. दोन्ही शाखांचे काम उत्तम झाले आहे. याशिवाय सिटी चौक पोलिसांनीही दुचाकी शोधण्यात मोठी आघाडी घेतली. मागील वर्षात एकूण ३१ खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खुनाचा प्रयत्न ४१, सदोष मनुष्यवधाचे ४ गुन्हे नोंदविण्यात आले. ते सर्वच उघड करण्यात आले. वर्षभरात महिलांवर बलात्काराचे ८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील ८७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
शहर पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे दाखल केलेला आहे. त्यावर महासंचालक कार्यालयाने संबंधित हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. यासाठी पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. या हद्दवाढीमध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यासह शेंद्रा, बिडकीन इ. भागांचा समावेश असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
२५ लाख रुपयांची बक्षिसे
उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे रिवॉर्ड दिले आहेत. त्याची कोणतीही जाहिरातबाजी केली नाही. जे अधिकारी काम करतात, त्यांचे कौतुक केले जाते. काहींचे कानही टोचले जातात. ते बंद दाराच्या आड असते. त्याचीही वाच्यता केली जात नाही, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.