नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:17 AM2017-09-19T01:17:21+5:302017-09-19T01:17:21+5:30
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार डॉ. स्वाती दैठणकर, व्ही. सौम्याश्री, हेमांगी पिसाट आणि निकिता बानावलीकर यांनी सादर के लेल्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार डॉ. स्वाती दैठणकर, व्ही. सौम्याश्री, हेमांगी पिसाट आणि निकिता बानावलीकर यांनी सादर के लेल्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यम्, ओडिसी, कुचीपुडी या शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते अक्षता प्रकाश कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दशकपूर्ती महोत्सवाचे.
यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात आयोजित या महोत्सवाची रविवारी (दि.१७) सांगता झाली. याप्रसंगी डॉ. स्वाती दैठणकर यांनी भरतनाट्यम् या नृत्यशैलीद्वारे सीता, द्रौपदी या आजच्या काळात आल्या, तर काय म्हणतील, याचे अतिशय समर्पक सादरीकरण केले. ज्या गोष्टींना सीता सामोरे गेली, त्याच बाबींना आजच्या स्त्रीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीला डॉ. दैठणकर यांनी आपल्या नृत्याविष्कारातून एक प्रकारे वाचा फोडत उपस्थित रसिकांना क्षणभर विचार करण्यास भाग पाडले.
महोत्सवाची सुरुवात ‘देवमुद्रा’च्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यातून सादर केलेल्या गणेशवंदन, पुष्पांजलीने झाली. यानंतर हेमांगी पिसाट यांनी ओडिसी नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी सावेरी पल्लवी नृत्य प्रकार आणि ओडिसीतील दशावतार, तर व्ही. सौम्याश्री यांनी कुचीपुडी, निकिता बानावलीकर यांनी कथ्थक सादर केले.
महोत्सवात शनिवारी घेण्यात आलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत प्रथम गिरिजा गोळे, द्वितीय रिद्धी बारपांडे, तर तृतीय क्रमांक ऐश्वर्या ताटी यांनी प्राप्त केला. ईशिता कुलकर्णी, श्रावणी मुंगी, अक्षता देशपांडे, मृणाल सोनवणे, अंकिता पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी नृत्यगुरूंचा सत्कार करण्यात आला. महोत्सवासाठी डॉ. पी.एस. कुलकर्णी, विजय न्यायाधीश, गिरीश महाजन, स्वाती जोशी, योगेश्वरी शेवतेकर, सुधा न्यायाधीश आदींनी परिश्रम घेतले. रोहिणी पिंपळे-यादव, पूजा खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवास मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.